Bhaskar Jadhav and Milind Narvekar: आधी सहा खासदार फुटले, आता ठाकरे गटातील दोन बड्या नेत्यांमध्ये धुसफूस, ‘तो’ व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?


Bhaskar Jadhav and Milind Narvekar: सहा खासदार फुटल्यामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झालेल्या ठाकरे गटातील एक नवा अंतर्गत वाद समोर आला आहे. ज्येष्ठ नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि उद्धव ठाकरे यांचे एकेकाळचे राईट हँड असलेले मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्यातील धुसफूस उघड झाली. एरवी ही गोष्ट कोणाच्या लक्षातही आली नसती. मात्र, मिलिंद नार्वेकर यांनी भास्कर जाधव यांचा एक व्हिडीओ ट्विट करुन स्वत: हा वाद चव्हाट्यावर आणला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटातील नेते उघडउघडपणे आपापसांत भिडणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Maharashtra Politics News)

मिलिंद नार्वेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडीओ शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीचा आहे. 19 जून रोजी माटुंगा येथील षणमुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला. त्यावेळी एक-एक नेते सभागृहात येत होते. सभागृहाच्या बाहेर असलेले प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या नेत्यांच्या प्रतिक्रिया घेत होते. यावेळी एका वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्यासमोर भास्कर जाधव हे बोलत होते. त्यांच्या आजुबाजूला शिवसैनिकांची प्रचंड गर्दी होती. भास्कर जाधव कॅमेऱ्यासमोर बोलत असताना मागून मिलिंद नार्वेकर यांची गाडी आली.  भास्कर जाधव हे रस्त्यात उभे असल्यामुळे मिलिंद नार्वेकर यांच्या ड्रायव्हरने गाडीचा हॉर्न जोरात वाजवला. सुरुवातीला भास्कर जाधव यांना नेमकं कोण आलं हे कळालं नाही आणि ते गाडीच्या मार्गातून बाजूला होऊन गेटमधून आत आले. त्यानंतर त्यांना ती गाडी मिलिंद नार्वेकर यांची असल्याचे समजले. तेव्हा भास्कर जाधव हे उद्वेगाने ‘नार्वेकर कोण लागून गेला?’, असे बोलून गेले. त्यांचे हे वाक्य कॅमेऱ्यात टिपले गेले. 

मिलिंद नार्वेकर यांनी भास्कर जाधव यांच्या नेमक्या वक्तव्याची क्लीप सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये मिलिंद नार्वेकर यांनी खोचक कॅप्शनही लिहली आहे. Frustration! माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसजी, उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा; कारण यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे, असे मिलिंद नार्वेकर यांनी म्हटले आहे. मिलिंद नार्वेकर यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. मिलिंद नार्वेकर यांनी कोणाच्याही फारसा लक्षात न आलेली ही गोष्ट चव्हाट्यावर आणून एकप्रकारे भास्कर जाधव यांना डिवचत आव्हान दिले आहे. एवढेच नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते करा, अशी विनंती करुन महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीसांचा  शब्द अंतिम असतो, हे अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले आहे. उद्धव ठाकरे हे सातत्याने फडणवीस आणि भाजप यांच्यावर टीका करत असताना मिलिंद नार्वेकर यांची ही कृती चर्चेचा विषय ठरत आहे. 

आणखी वाचा

शिवसेनेचे ॲापरेशन टायगर यशस्वी; आज 6 खासदारांचे एकत्र फोटो-व्हिडीओ प्रसिद्ध होणार, सगळ्यात मोठी घडामोड घडणार!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *