IND vs SA Women’s T20 World Cup 2026 : जिंकलेली बाजी हरली! टीम इंडियाच्या ‘त्या’ एका चुकीमुळे कॅपने फिरवला अख्खा गेम; महिला विश्वचषकात भारताचा पहिला पराभव


South Africa vs India ICC Women’s T20 World Cup 2026 : महिला टी-20 वर्ल्डकप 2026 मधील 18 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा 4 गडी राखून पराभव केला. भारताने विजयासाठी दिलेल्या 159 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने मारिजाने कॅपच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर विजय मिळवला. भारताचा या विश्वचषकातील हा पहिलाच पराभव आहे.

भारताची संथ फलंदाजी; एकही अर्धशतक नाही

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरचा निर्णय फारसा फायदेशीर ठरला नाही. उपकर्णधार स्मृती मानधना (17 धावा) आणि फॉर्मात असलेली शेफाली वर्मा (31 धावा) पॉवरप्लेमध्येच बाद झाल्या. यानंतर भारतीय डावाला गती देता आली नाही. यास्तिका भाटिया (15) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (12) स्वस्तात परतल्या. आपला 200 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या कर्णधार हरमनप्रीत कौरने 22 चेंडूत 24 धावा केल्या, तर दीप्ती शर्माने 29 धावांचे योगदान दिले. भारताचा एकही फलंदाज अर्धशतक झळकावू शकला नाही आणि संघाने निर्धारित 20 षटकांत 158 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून शबनीम इस्माईल आणि मारिजाने कॅपने प्रत्येकी 2 बळी घेतले.

श्री चराणीचे दुहेरी धक्के आणि भारताचे पुनरागमन

159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीर लॉरा वोल्वार्ड आणि ताझमीन ब्रिट्स यांनी संथ सुरुवात केली होती. मात्र, पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात भारताच्या श्री चराणीने अप्रतिम गोलंदाजी करत एकाच षटकात कर्णधार वोल्वार्ड (20) आणि एनेरी डर्कसेन (0) यांना बाद करून भारताला सामन्यात परत आणले.

कॅप-ब्रिट्सची भागीदारी आणि भारताचे खराब क्षेत्ररक्षण

दोन गडी लवकर गमावल्यानंतर मारिजाने कॅप आणि ताझमीन ब्रिट्स यांनी तिसऱ्या गड्यासाठी 97 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. भारताने या दरम्यान सुमार क्षेत्ररक्षण केले आणि सोपे झेल सोडले. 17 व्या षटकात शेफाली वर्माने ब्रिट्सला (40 धावा) बाद करून ही जोडी फोडली. परंतु, याच षटकात राधा यादवने मारिजाने कॅपचा एक अत्यंत सोपा झेल सोडला, जो भारताला महागात पडला.

मारिजाने कॅपची मॅच-विनिंग खेळी

दोन जीवनदान मिळालेल्या मारिजाने कॅपने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. तिने अवघ्या 45 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 81 धावांची मॅच-विनिंग खेळी केली. ही तिच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. तिच्या या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकून सलग दुसरा विजय नोंदवला. भारताकडून श्री चराणीने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर दीप्ती शर्मा (44 धावा) आणि प्रेमा रावत (21 धावा) खूप महागड्या ठरल्या. खराब क्षेत्ररक्षण आणि मोक्याच्या क्षणी सुटलेले झेल यामुळे भारताला या हक्काच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

हे ही वाचा –

Sri Lanka A vs India A, Final: भारत ‘अ’ संघाने श्रीलंका ‘अ’ संघाला 66 धावांनी पराभूत करून तिरंगी मालिका जिंकली; वैभव सूर्यवंशीचा जाळ अन् धूर संगटच, 20 वर्षांपूर्वीचा पराक्रम मोडीत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *