Last Updated:
Salman Khan NEET : सलमान खानने नीट पेपरफुटी विरोधातील आंदोलनाला विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यानंतर त्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
बॉलिवूडचा ‘भाईजान’ म्हणजेच सलमान खानने नीट पेपरफुटी विरोधात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. सोशल मीडियावर त्याने लांबलचक पोस्ट लिहित हा एक गंभीर मुद्दा असल्याचं म्हटलं आहे. पण आता सलमानने ही पोस्ट केल्यानंतर काही तासांनंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होऊ लागला, ज्यात सलमानचे वडील सलीम खान सलमान स्वत: लीक पेपरमुळे पास झाल्याचं सांगितलं आहे.
सलमान खानने बुधवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून NEET पेपरफुटीला ‘अत्यंत गंभीर मुद्दा’ म्हटलं. त्याने त्याच्या शालेय जीवनातील एक जुना फोटो शेअर करत लिहिलं, ‘हे इतकं शांततापूर्ण आंदोलन होतं, दुर्दैवाने त्याला हिंसक वळण घ्यावं लागलं. माझं हृदय त्या विद्यार्थ्यांसोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहे ज्यांना दुखावलं गेलं.’
त्याने विद्यार्थ्यांच्या उत्साहाचं कौतुक करत म्हटलं की, ते शिक्षणासाठी समर्पित आहेत आणि ही पिढी भारताला अभिमान वाटेल असे काम करेल. मात्र, त्याने आंदोलनाला राजकीय रंग देण्यापासून सावध केलं. सलमानने लिहिलं, ‘हा मुद्दा विद्यार्थी आणि शिक्षण प्रणाली यांच्यातील आहे, त्याला राजकीयदृष्ट्या हायजॅक करू नये.’ त्याने आशा व्यक्त केली की सरकार विद्यार्थ्यांना पाठिंबा देईल आणि शिक्षण प्रणाली मजबूत करेल.
दरम्यान भाईजानच्या या वक्तव्यानंतर लगेचच सोशल मीडियावर ‘द कपिल शर्मा शो’चा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये सलमान खान त्याचे वडील सलीम खान आणि भाऊ अरबाज खान, सोहेल खान यांच्यासोबत दिसत आहे. या शोमध्ये सलीम साहेबांनी मुलांची पोलखोल केली.
सलीम यांनी सांगितलं की, “आमच्या घरी एक माणूस यायचा. तेव्हा सगळे म्हणायचे, ‘गणेश आला… गणेश आला. गणेशला चहा पाजा. गणेशला बसायला स्टूल द्या.’ मी म्हटलं हा कोण आहे? माझ्या घरात मला जेवढा आदर मिळतो त्यापेक्षा जास्त आदर याला मिळतो.’
सलीम खान यांनी त्याचा शोध घेतला तेव्हा त्यांना कळलं की गणेश ती व्यक्ती होती जी त्यांच्या मुलांना लीक झालेले परीक्षेचे पेपर आणून देत असे. सलीम म्हणाले, ‘जेव्हा परीक्षेचा पेपर लीक होत असे, तेव्हा तो यांना आणून देत असे.’
सलमानने स्वतःही हे मान्य केलं की त्याने लीक झालेल्या पेपर्सच्या मदतीने काही परीक्षा पास केल्या होत्या. या खुलाशावर संपूर्ण प्रेक्षक आणि खान कुटुंबातील सदस्य हसताना दिसत आहेत.
हा जुना व्हिडिओ पुन्हा समोर आल्यानंतर नेटिझन्स दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. काही युझर्सनी शालेय परीक्षा आणि नीटसारखी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षा यांची तुलना करणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. हा व्हायरल व्हिडिओ एका हलक्या-फुलक्या कौटुंबिक किस्साचा भाग होता आणि त्याला आजच्या वादाशी जोडणं योग्य नाही. तर इतर अनेक युझर्सनी सलमान खानवर टीका करत त्याला ‘ढोंगी’ म्हटलं. त्यांचं म्हणणं आहे की शालेय परीक्षा असो किंवा स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी आणि कॉपी कोणत्याही स्वरूपात चुकीची आहे.
Mumbai,Maharashtra
सलमान स्वत:च लीक पेपरने पास? वडील सलीम यांनीच केलेली पोलखोल; भाईजान NEET मुद्द्यावर बोलताच जुना VIDEO VIRAL
