बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश


संभाजीनगर : देशभरात एकीकडे नीट पेपरफुटीवरुन (Neet) तरुणाई आक्रमक बनली असून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर गेल्या 25 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे एनटीएने पुन्हा एकदा नीट परीक्षा घेऊन त्याचा निकालही जाहीर केला. मात्र, नीटच्या पुनर्परिक्षेनंतरही विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचं काही ठिकाणी दिसून आलं. बीडमधील दोन विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने त्यांनी थेट छ. संभाजीनगरच्या उच्च न्यायालयात (highcourt) याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली, त्यानुसार न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. 

नीट परीक्षेच्या निकालावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. कारण, बीडमधील दोन विद्यार्थ्यांनी एनटीएच्या मूल्यमापन प्रक्रियेवरच आरोप केले आहेत. एका विद्यार्थ्याला 522 गुण अपेक्षित असताना स्कोअरकार्डवर अवघे 95 गुण मिळाले, तर दुसऱ्या विद्यार्थिनीला 702 पेक्षा अधिक गुण अपेक्षित असताना केवळ 87 गुण मिळाल्याचा दावा करण्यात आला. या निकालानंतर पालक न्यायासाठी हायकोर्टात जाण्याच्या तयारी दर्शवली होती. त्यानुसार, याप्रकरणी उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. 

बीडच्या शुभम गवते याने नीट 2026 त्याने परीक्षा दिली होती, त्याची अँन्सर की आणि ओ.एम.आर.शीट पाहता जास्त मार्क मिळायला हवे होते. मात्र, त्याला अवघे 95 गुण मिळाले आहेत. त्यामुळे, आपल्या निकालाबाबत गोंधळ झाल्याचा आरोप करत त्याने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याबाबत आज न्यायालयात सुनावणी झाली, न्यायालयाने परीक्षा घेणाऱ्या एनटीएला नोटीस बजावली आहे. तसेच, त्या दोन्ही विद्यार्थ्यांची मूळ उत्तरपत्रिका कोर्टात सादर करायलाही न्यायालयाने सांगितले आहे. तसेच, एक आठवड्यात उत्तर पत्रिका न्यायालयात द्यायची आहे, त्यानंतर पुढील सुनावणी होईल, अशी माहिती याचिका कर्त्यांचे वकील महेंद्र पंडितराव गंडले यांनी दिली.

16 जुलै रोजी निकाल जाहीर

देशातील नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर पुन्हा नव्याने नीट परीक्षा घेण्यात आली. या री- युजी नीट परीक्षेचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर झाला. देशात आणि राज्यात अव्वल गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी सेलीब्रेशन सुरू झाले. मात्र, बीडच्या सोहम गवतेच्या कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. उत्तरपत्रिका आणि अँसर की तपासल्यानंतर 522 गुण मिळतील, अशी खात्री असलेल्या सोहमच्या स्कोअरकार्डवर मात्र अवघे 95 गुण दिसले. निकाल पाहिल्यानंतर काही वेळ तो कोणाशीच बोलला नाही आणि गवते कुटुंबीयांच्या घरात अश्रूंचा बांधच फुटला.

मुलाने रात्रंदिवस अभ्यास केला, अनेकदा दोन-तीन तासांपेक्षा जास्त झोप घेतली नाही. वेळेवर जेवणही केलं नाही… आजारी पडला तरी अभ्यास थांबवला नाही. पण, निकालाने सगळ्याच मेहनतीवर पाणी फेरल्याची भावना सोहमच्या आईने व्यक्त केली. तर, वडिलांनी ओएमआर शीट आणि अँसर की तपासल्यानंतर मोठी तफावत आढळल्याचा दावा करत, न्याय न मिळाल्यास थेट हायकोर्टात जाणार असल्याचं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. 

हेही वाचा

पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *