शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात


नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणावरुन दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळत आहे.  केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला विविध संघटनांनी राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. आता काँग्रेस देखील मैदानात उतरली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन सुरू केलं होतं. मात्र, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याबरोबर अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे तसेच सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना देखील दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

धर्मेंद्र प्रधान त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आता काँग्रेस स्वस्त बसणार नाही

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या समवेत आंदोलन करत असलेल्या अमरावती जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखडे यांचा देखील सहभाग आहे. दरम्यान खासदार बळवंत वानखडे यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये टाकून ठेवल आहे. खासदार बळवंत वानखडे यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. शांततेमध्ये आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आम्हाला अटक केली तसेच राहुल गांधी यांना सुद्धा बळजबरीने उचलून नेल्याचे वानखेडे म्हणाले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आता काँग्रेस स्वस्त बसणार नाही, असा इशारा काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी दिला आहे. 

सांगलीचे खासदार विशाल पाटलांना देखील पोलिसांनी घेतलं ताब्यात

सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि खासदार प्रियांका गांधी यांना दिल्लीतील मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात अटक करुन नेण्यात आले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. 

राहुल गांधींना ताब्यात घेणे म्हणजे लोकशाहीवर आघात, नितीन राऊतांचा हल्लाबोल, नागपुरातही आंदोलन

नीट पेपर लीकविरोधातील दिल्लीतील धरना आंदोलनात काँग्रेस आमदार डॉ. नितीन राऊत यांना पोलिसांनी आंदोलनात सहभागी होण्यापूर्वीच ताब्यात घेतलं आहे. राहुल गांधींसोबत आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असताना दिल्ली पोलिसांनी कारवाई केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. डॉ. नितीन राऊत यांना पोलिसांनी बसमध्ये बसवून ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. जाफरपूर कला पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवल्याचा दावा केला आहे. नीट पेपर लीक आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेसचे आज आंदोलन होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस ठाम असल्याची डॉ. नितीन राऊत यांची भूमिका आहे. आंदोलन दडपून जनआक्रोश थांबणार नाही, असा इशारा डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे. राहुल गांधींना ताब्यात घेणे म्हणजे लोकशाहीवर आघात, डॉ. नितीन राऊत यांची टीका असल्याचं प्रासिद्धी पत्रकातून म्हटले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ  नागपूर शहर काँग्रेसच्या वतीने नागपूरच्या राजभवन समोर आंदोलन केले. शहर अध्यक्ष प्रफुल गुडधे यांच्या नेतृत्वात शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात नारे निदर्शने केली. दिल्ली येथे काँग्रेस पक्षाकडून सुरु असलेल्या आंदोलनाला समर्थन दिले. आंदोलनांनंतर पोलिसांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे.

जे इंग्रजांनी केलं ते आता भाजप आणि मोदी सरकार करतय

आज दिल्लीत जे घडलं ते निषेधार्थ आहे. एवढं गर्विष्ठ आणि एवढी गुरमी कशासाठी हे समजत नाही असे मत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. फक्त दादागिरी करताय. ऐकूण तर घ्या असे ठाकूर म्हणाल्या. विद्यार्थ्यांची जर तुम्हाला काळजी नसेल आणि तुम्हाला जर स्वतःच्याच मनानं करायचं असेल तर मग या देशाचं भवितव्य हा अंधारात आहे असं म्हणावं लागेल, याचा निषेध असल्याचे मत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.आज ज्याप्रकारे सगळ्यांना उचललं. काल ज्या प्रकारे तुम्ही लाठीचार्ज केला. जे इंग्रजांनी केलं ते आता भाजप आणि मोदी सरकार करत असल्याची टीका  यशोमती ठाकूर यांनी केली.  



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *