नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांच्यासह प्रियांका गांधी आणि काँग्रेसच्या इतर खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी काँग्रेसकडून नरेंद्र मोदी, अमित शाह, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. काँग्रेसच्या तीन तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर राहुल गांधी, प्रियांका गांधी, सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह इतर नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. दिल्ली पोलिसांनी अडीच तासानंतर प्रियांका गांधी, अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांची सुटका करण्यात आली. यानंतर प्रियांका गांधी यांनी सर्व मुद्यांवर भाष्य केलं.
प्रियांका गांधी काय म्हणाल्या?
दिल्ली पोलिसांनी सुटका केल्यानंतर प्रियांका गांधी म्हणाल्या की विद्यार्थी आपलीच मुलं आहेत, ते देशाचे भविष्य आहेत, त्यांची बाजू ऐकण्यात सरकारला काय अडचण होती. विद्यार्थी एका योग्य मुद्यासह आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांसोबत जे घडलं त्याच्या रागातून आंदोलन करण्यात आलं. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणं आमची जबाबदारी आहे. लोकशाहीत आंदोलन करण्याचा मुलभूत अधिकार असल्याचं प्रियांका गांधी म्हणाल्या.
आपल्याला शिक्षणची व्यवस्था जी मोडकळीस आलेली आहे ती दुरुस्त करायची आहे. त्यासाठी मोठी चर्चा झाली पाहिजे, यामुळं धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला पाहिजे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या. संसदेत चर्चा झाली पाहिजे, विद्यार्थी आंदोलन करत आहेत, त्यांचे मुद्दे ऐकून घेतले पाहिजेत, असं देखील प्रियांका गांधी यांनी म्हटलं. वंदे मातरमच्या सन्मानाचं बिल सरकार आणतेय, आपली मातृभूमी लोकशाही आहे, ही मुलं कोण आहेत, त्यांनीच आम्हाला संसदेत पाठवलं आहे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.
विद्यार्थ्यांनी आम्हाला संसदेत पाठवलं आहे. संसद त्यांची आहे, लोकशाही त्यांची आहे, देश त्यांचा आहे. तुम्ही त्यांचा विचार करत नाही, त्यांच्यासाठी विधेयक का आणत नाही, असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला. शिक्षणावर 1.4 लाख कोटी रुपये खर्च होतात. तर, अदानी-अंबांनींची 16 लाख कोटींची कर्ज माफ होतात आणि देशात शिक्षणासाठी 1. 4 लाख कोटी रुपयांचं बजेट आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करु नये, त्यांच्यावर अश्रूधुराच्या नळकांड्यांचा मारा करु नये, असं प्रियांका गांधी म्हणाल्या. छोट्या छोट्या मुलाी रुग्णालयात आहेत, त्यांच्या पालकांची स्थिती काय आहे ते पाहा, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.
संसदेत बोलायचं असेल तर विरोधी पक्षनेत्यांना परवानगी मिळत नाही. धरणे आंदोलन करायचं असेल तर परवानगी मिळत नाही, त्यामुळं त्यांना अपेक्षित असलेल्या ठिकाणी पोहोचलो, असं प्रियांका गांधी यांनी म्हटलं.
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं