Last Updated:
इंदूरमध्ये चुकून कचऱ्यात गेलेला 2 किलो वजनाचा पिढीजात चांदीचा कलश महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी तब्बल 24 तासांच्या शोधानंतर शोधून काढला.
इंदूर: देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या इंदूरने पुन्हा एकदा आपल्या प्रामाणिकपणाची आणि कार्यतत्परतेची ओळख करून दिली आहे. राजेंद्र नगर परिसरातील रावेरकर कुटुंबाचा सुमारे 2 किलो वजनाचा पिढीजात चांदीचा कलश चुकून घरातील कचऱ्यासोबत नगरपालिकेच्या कचरा वाहनात गेला. मात्र इंदूर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी शेकडो टन कचऱ्यात तब्बल 24 तास शोधमोहीम राबवत हा मौल्यवान कलश शोधून कुटुंबाच्या स्वाधीन केला. या घटनेनंतर सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि समर्पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शुक्रवारी सकाळी रावेरकर कुटुंबाने नेहमीप्रमाणे घरातील कचरा महानगरपालिकेच्या वाहनात टाकला. याच वेळी घरात पडलेली एक जुनी आणि फाटलेली पिशवीही चुकून कचऱ्यात गेली. कुटुंबीयांच्या लक्षात आले नाही की, त्या पिशवीत त्यांचा अनेक वर्षांपासून जपून ठेवलेला 2 किलो वजनाचा पिढीजात चांदीचा कलश ठेवलेला होता. सायंकाळी कलश शोधताना तो घरात न सापडल्याने कुटुंबीयांची घाबरगुंडी उडाली.
यानंतर कुटुंबीयांनी तातडीने वॉर्ड क्रमांक 80 चे नगरसेवक प्रशांत बडवे यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. नगरसेवकांनी संबंधित कचरा वाहनाच्या चालकाला संपर्क केला. त्यावेळी कचरा आधी लालबाग ट्रान्सफर स्टेशन येथे आणि तेथून पुढे देवगुराडिया ट्रेंचिंग ग्राउंड येथे पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली.
देवगुराडिया ट्रेंचिंग ग्राउंडमधील नेप्रा प्लांट येथे कोरड्या कचऱ्याचे प्रचंड ढीग जमा झाले होते. तरीही महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी हार न मानता शनिवारी सकाळपासून कलशाचा शोध सुरू केला. शेकडो टन कचऱ्याची छाननी करत त्यांनी तब्बल 24 तास अखंड शोधमोहीम राबवली.
अखेर 24 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबलेला चांदीचा कलश देवगुराडिया ट्रेंचिंग ग्राउंड येथे कर्मचाऱ्यांना सापडला. यानंतर नगरसेवक प्रशांत बडवे यांच्या उपस्थितीत हा कलश सुरक्षितपणे रावेरकर कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला. कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास टाकत महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले.
देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून अनेक वर्षे अव्वल क्रमांक पटकावणाऱ्या इंदूरमध्ये ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेकदा सफाई कर्मचाऱ्यांनी कचऱ्यात चुकून गेलेले सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू शोधून संबंधित नागरिकांना परत दिल्या आहेत.
या प्रामाणिकपणाचा गौरव करण्यासाठी रविवारी राजेंद्र नगर परिसरातील नागरिकांनी कार्यक्रम आयोजित करून या सफाई कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार केला. या घटनेमुळे इंदूरची केवळ स्वच्छ शहर म्हणूनच नव्हे, तर प्रामाणिक आणि जबाबदार नागरी व्यवस्थेचे उदाहरण म्हणूनही पुन्हा एकदा देशभरात चर्चा होत आहे.
Mumbai,Maharashtra
कचऱ्यात गेला रावेरकरांना 2 किलोचा चांदीचा कलश; २४ तासांची शोध मोहिम अन् शेकडो टन कचऱ्यातून इंदूरच्या मराठी नगरसेवकाने शोधून परत केला ऐतिहाकि वारसा
