कोल्हापुरात होणार इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, 35 हजार प्रेक्षक क्षमता, जागाही ठरली! | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तराचं क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या दिशेने मोठं पाऊल पडलं आहे.

कोल्हापुरात होणार इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, 35 हजार प्रेक्षक क्षमता, जागाही ठरली!
कोल्हापुरात होणार इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, 35 हजार प्रेक्षक क्षमता, जागाही ठरली!

मुंबई : कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तराचं क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या दिशेने मोठं पाऊल पडलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तसंच क्रीडा मंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए) आणि क्रीडा विभाग यांच्यात एमओयू वर स्वाक्षरी झाली आहे. या स्टेडियममुळे कोल्हापूरच्या खेळाडूंना खेळाच्या विश्वस्तरीय सुविधा मिळतील तसंच कोल्हापुरात नवीन क्रिकेटपटू तयार व्हायला मदत होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

या कार्यक्रमाला मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर तसंच आमदार अमल महाडिक आणि कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंग देओल, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह अनेक मोठे अधिकार आणि क्रीडा प्रशासक उपस्थित होते.

कुठे उभारलं जाणार स्टेडियम?

करवीर तालुक्यातील विकासवाडी भागामधल्या 12.76 हेक्टर (31.90 एकर) सरकारी जमिनीवर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारलं जाणार आहे, यासाठीची जमीन कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला हस्तांतरित करण्यात आली आहे. स्टेडियमच उभारण बीसीसीआय आणि आयसीसीच्या मानकांनुसार केली जाणार आहे, ज्यात 35 हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता असेल. क्रिकेट स्टेडियमशिवाय हा भाग मल्टी स्पोर्ट्स हब म्हणून विकसित केला जाईल, असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे. या भागात बॉक्सिंग, ज्युडो, तिरंदाजी, कुस्ती, स्विमिंग, टेबल टेनिस आणि तलवारबाजी यासारख्या खेळांसाठी आधुनिक सुविधा विकसित केल्या जातील.

या संपूर्ण भागात आधुनिक पॅव्हेलियन, प्रॅक्टिस मैदाना, इनडोर प्रशिक्षण केंद्र, स्पोर्ट्स सायन्स सेंटर, क्लब हाऊस, फ्लडलाईट सिस्टीम, क्रिकेट संग्रहालय, खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी पार्किंग, इंटरनल रोड, ड्रेनेज सिस्टीम, अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था यांचा समावेश असेल. याशिवाय स्टेडियम परिसरात एक क्रिकेट संग्रहालयही उभारलं जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *