Last Updated:
पुणे शहरातील महत्वाच्या मार्गाचे भूमिपूजनपार पडणार आहे. ते तीन मार्ग कोणते आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे याविषयी जाणून घेऊ.
पुणे : पुणेकरांना करावा लागत असलेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार असून 18 जुलैला पुणे शहरातील महत्वाच्या मार्गाचे भूमिपूजनपार पडणार आहे. ते तीन मार्ग कोणते आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे याविषयी जाणून घेऊ.
पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाणारे तीन महामार्ग प्रकल्प आता मार्गी लागणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने शनिवार, 18 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे या तीन प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये पुणे–शिरूर महामार्ग, हडपसर–यवत उन्नत मार्ग आणि तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्ग या प्रकल्पांचा समावेश आहे. हे मार्ग पूर्ण झाल्यानंतर शहरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांचा प्रवास अधिक वेगवान होण्यास मदत होईल.
पुणे–शिरूर उन्नत महामार्ग हा सहा पदरी असणार असून त्याची लांबी 53.4 किलोमीटर आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 7 हजार 300 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. तसेच वाघोली येथे दुमजली उड्डाणपूलही बांधण्यात येणार आहे. हा महामार्ग सुरू झाल्यानंतर पुणे–नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. यामुळे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा प्रवास अधिक सोपा आणि जलद होणार आहे. तसेच या मार्गावरील प्रवासाचा वेळ सुमारे 2 तास 45 मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी हडपसर–यवत उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. हा मार्ग सुमारे 31.5 किलोमीटर लांबीचा असेल. या प्रकल्पासाठी अंदाजे 5 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने अनेकदा वाहतूक कोंडी होते. उन्नत मार्ग तयार झाल्यानंतर ही कोंडी कमी होण्यास मदत होईल. हा प्रकल्प पुढील तीन ते चार वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे.
मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरून थेट पुणे–नगर महामार्गावर जाण्यासाठी नवीन जोडमार्ग उभारण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर न येताही वाहनांना पुढील प्रवास करता येणार आहे. यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल.या मार्गाची एकूण लांबी 53.2 किलोमीटर असणार असून, त्यासाठी तब्बल 6 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहनचालकांचा वेळ वाचणार असून, प्रवास अधिक सोपा आणि सुरळीत होईल.
Pune,Maharashtra
