Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची ‘मन की बात’, इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी


मुंबई : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे (Petrol) वाहनांचा मायलेज कमी झाल्याच्या तक्रारी सातत्याने पाहायला मिळत आहेत. अनेक युट्यूबर्संने याबाबत व्हिडिओ बनवून आपली भूमिका मांडली आहे, तर काही मिम्सही व्हायरल झाले आहेत. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरींना मेन्शन करत नेटीझन्स आपला अनुभव सांगत आहेत. मात्र, काहीजण मला जाणीवपूर्वक टार्गेट करत असून माझ्याविरुद्ध पेड कॅम्पेन राबवले जात असल्याचं नितीन गडकरींनी म्हटलं होतं. आता, ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरेंनीही (aaditya thackeray) इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मायलेज कमी झाल्याचे सांगत थेट पंतप्रधान नरेंद मोदींना (Narendra modi) पत्र लिहिले आहे. तसेच, ग्राहकांना 100 टक्के पेट्रोल आणि इथेनॉलमिश्रित पेट्रोल असा पर्याय उपलब्ध करुन देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. 

आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे लाखो भारतीयांवर परिणाम झाल्याचं म्हटल. केंद्र सरकारकडून इथेनॉल-मिश्रित इंधनाचा वापर अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावर हे पत्र लिहिण्यात आले आहे. या निर्णयामुळे लाखो भारतीय वाहनधारकांवर परिणाम झाला असून, त्याचा व्यापक अर्थव्यवस्थेवरही परिणाम दिसून येत आहे, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. तसेच, एखाद्या विशिष्ट हितसंबंधी गटाला लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने भारतीय नागरिकांवर हा निर्णय लादणे, असे या इथेनॉलच्या मुद्द्याचे स्वरूप बनू नये. त्याऐवजी नागरिकांना परवडणाऱ्या दरात पर्याय उपलब्ध करून दिला जावा, अशी मागणी देखील या पत्रातून आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 

आदित्य ठाकरे पत्रात म्हणतात, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे वाढते मिश्रण याबाबत देशभरातील लाखो वाहनधारक, विशेषतः युवक आणि मध्यमवर्गीय नागरिक, व्यक्त करत असलेल्या वाढत्या चिंतेकडे आपले लक्ष वेधण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. देशातील बहुतांश कुटुंबांसाठी दुचाकी किंवा चारचाकी वाहन खरेदी करणे ही ऐशोआरामाची गोष्ट नसते. अनेक वर्षांच्या कष्टातून, बचतीतून आणि अनेकदा दीर्घकालीन कर्ज (EMI) फेडत हे वाहन घेतले जाते. त्यामुळे वाहन उत्पादकांनी दिलेल्या आश्वासनांनुसार ते वाहन अपेक्षित कामगिरी आणि इंधन कार्यक्षमता (मायलेज) देईल, अशी ग्राहकांची अपेक्षा असते. परंतु, इथेनॉलचे प्रमाण वाढल्यापासून अनेक नागरिकांचा दावा आहे की त्यांच्या वाहनांचे मायलेज कमी झाले असून वाहनाची कामगिरीही घसरली आहे. सध्या रस्त्यावर धावणाऱ्या अनेक वाहनांची रचना जास्त प्रमाणातील इथेनॉल मिश्रित इंधनासाठी मूळतः करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणताही पर्याय उपलब्ध नसताना या धोरणाचे परिणाम वाहनधारकांवर लादले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे.

निर्णयाचा विशिष्ट कंपन्यांनाच फायदा 

इथेनॉल निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड वाढवली जात असल्याबाबतही आदित्य यांनी चिंता व्यक्त केली जात आहे. ऊस हे देशातील सर्वाधिक पाणी लागणाऱ्या पिकांपैकी एक आहे. भारतातील अनेक भाग गंभीर पाणीटंचाईचा सामना करत असताना, हा मार्ग खरोखरच शाश्वत आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच, या धोरणाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांपेक्षा काही विशिष्ट कंपन्या आणि औद्योगिक गटांना अधिक होत असल्याची व्यापक धारणा निर्माण झाली आहे. ही धारणा खरी असो वा नसो, या शंकांचे आणि चिंतेचे पारदर्शकपणे निरसन होणे अत्यंत आवश्यक आहे. 

दोन्ही पर्याय उपलब्ध करुन द्यावेत

जगातील अनेक देशांमध्ये ग्राहकांना त्यांच्या पसंतीचे इंधन निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. ज्या वाहनांमध्ये इथेनॉल मिश्रित इंधन वापरण्याची क्षमता आहे, ते वाहनधारक ते इंधन वापरू शकतात; तर इतर वाहनधारकांना नियमित पेट्रोल वापरण्याचा पर्याय उपलब्ध असतो, असे आदित्य यांनी पत्रात म्हटले. देशातील नागरिकांचे ग्राहकहित लक्षात घेऊन अशाच प्रकारचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी 100 % शुद्ध पेट्रोल आणि इथेनॉल-मिश्रित पेट्रोल (ज्या ग्राहकांना ते वापरायचे आहे त्यांच्यासाठी) असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात द्यावेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार इंधन निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल, सध्या वापरात असलेल्या लाखो वाहनधारकांची गैरसोय टळेल आणि सरकारच्या धोरणांबाबत जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल. देशातील कष्टकरी मध्यमवर्ग, युवक आणि लाखो वाहनधारकांच्या हिताचा विचार करून आपण या विनंतीचा सकारात्मक विचार कराल, असेही आदित्य यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा

सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *