भिवंडी: देशभरात सध्या ‘नीट’ (NEET) परीक्षेच्या पेपरफुटीचे प्रकरण गाजत असतानाच, आता महाराष्ट्रातील ६ लाखांपेक्षा जास्त भावी शिक्षकांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (TET) पेपरफुटीबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका छापखान्यातून अवघ्या ८ हजार रुपयांमध्ये बाहेर काढलेला प्रश्नपत्रिकेचा संच दलालांच्या जाळ्यातून फिरत-फिरत जेव्हा भिवंडीत पोहोचला, तेव्हा त्याची किंमत तब्बल 80 हजार रुपयांवर गेल्याचा खळबळजनक खुलासा पोलीस तपासात झाला आहे.
TET Exam Paper Leak: असा झाला लाखोंच्या स्वप्नांचा बाजार
शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो उमेदवारांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या टीईटी पेपरफुटी रॅकेटचा पर्दाफाश भिवंडी पोलिसांनी केला आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित छापखान्यातील कर्मचारी नरेशकुमार याने हा अत्यंत गोपनीय पेपर मुख्य फरार आरोपी बिजेंद्र गुप्ताचा साथीदार सोनू याला अवघ्या ८ हजार रुपयांत विकला होता. यानंतर बिजेंद्र गुप्ताने आपल्या विविध राज्यांमधील एजंट्स आणि दलालांच्या साखळीचा वापर करून हा पेपर सुरुवातीला ८० हजार रुपयांना विकला. पुढे जसा जसा हा पेपर प्रत्येक टप्प्यावरील दलालांकडे गेला, तसा तसा त्यांनी स्वतःचा मोठा नफा त्यात जोडला. भिवंडीतील ग्राहकांपर्यंत हा पेपर पोहोचेपर्यंत त्याची किंमत तब्बल १.५ कोटी रुपयांवर गेली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून प्रश्नपत्रिकेची मूळ प्रत हस्तगत करण्यात आली आहे. या संपूर्ण रॅकेटचा मुख्य मास्टरमाईंड बिहारचा रहिवासी बिजेंद्र गुप्ता हा असून तो सध्या फरार आहे.
TET Exam Paper Leak: मास्टरमाईंडची हायटेक कार्यपद्धती
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार आरोपी बिजेंद्र गुप्ता हा अत्यंत शातिर आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करत असे. देशभरातील विविध राज्यांच्या गोपनीय प्रश्नपत्रिका ज्या छापखान्यांमध्ये (Printing Press) छापल्या जातात, अशा ठिकाणांची तो आधी माहिती काढायचा. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना पैशांचे मोठे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढायचा. कोणत्याही राज्याची प्रश्नपत्रिका छापायला आली की, ती कर्मचाऱ्यांच्या मदतीने चोरून संबंधित राज्यातील एजंटांमार्फत लाखो रुपयांना विकली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.
TET Exam Paper Leak: सुरक्षा यंत्रणेला ठेंगा दाखवत छपाई कर्मचाऱ्यानेच चोरला पेपर
२८ जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ‘महीम पत्रम प्रायव्हेट लिमिटेड’ या छापखान्यात छपाईसाठी पाठवण्यात आली होती. तिथे सुरक्षेची चोख व्यवस्था असतानाही, तिथला कर्मचारी नरेशकुमार मौहर ऊर्फ निकी याने सुरक्षा यंत्रणेतील पळवाटा शोधून प्रश्नपत्रिका बाहेर काढली. सूत्रांच्या माहितीनुसार, छापखान्यातून बाहेर पडताना केवळ कपड्यांची वरवर झडती घेतली जात असल्याचे नरेशकुमारने हेरले होते. टीईटीच्या पेपर-१ आणि पेपर-२ चे प्रत्येकी दोन संच छापले जात असल्यामुळे परीक्षेच्या दिवशी कोणताही एक संच निवडण्याचा नियम होता. याचाच गैरफायदा घेत नरेशकुमारने सलग तीन दिवस सुरक्षेला चकवा देऊन चारही संच छापखान्याबाहेर काढले आणि ते मुख्य आरोपीच्या साथीदाराला आणून दिले.
TET-2026 परीक्षेसाठी राज्यभरातील सुमारे सहा लाख उमेदवार आणि १,०२८ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता राखण्यासाठी परीक्षा परिषदेने राज्याबाहेरील आग्रा येथील अत्यंत गोपनीय ‘महीम पत्रन प्रायव्हेट लिमिटेड’ या छापखान्यात छपाईची जबाबदारी दिली होती. छापखान्याभोवती कडेकोट सुरक्षा, माजी सैनिकांचा पहारा आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची अंगझडती घेतली जात होती. मात्र, सुरक्षेतील एक छोटीशी चूक संपूर्ण व्यवस्थेवर भारी पडली.
TET Exam Paper Leak: बुटाच्या इनसोलमध्ये लपवून बाहेर काढले चारही सेट
१५ ते १७ जूनदरम्यान छपाई सुरू असताना प्रेसमधील कर्मचारी नरेशकुमार पुरनचंद माहौर उर्फ निक्की याने प्रश्नपत्रिकेची पाने घडी करून ती बुटाच्या इनसोलखाली लपवली. सुरक्षा रक्षकांनी शरीराची तपासणी केली, पण बुटांची नाही. याचाच फायदा घेत त्याने सलग तीन दिवस पेपर-१ आणि पेपर-२ चे चारही संच छापखान्याबाहेर काढले. त्यामुळे परीक्षेच्या दिवशी कोणताही संच निवडण्याची परीक्षा परिषदेची योजना पूर्णपणे फसली.
TET Exam Paper Leak: ८ हजारांत बाहेर पडलेला पेपर ८० हजारांत विकला गेला
छापखान्यातून अवघ्या ८ हजार रुपयांत बाहेर पडलेली प्रश्नपत्रिका मुख्य सूत्रधार बीजेंद्र कुमार गुप्ता याने आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून तब्बल ८० हजार रुपयांना विकल्याचे तपासात समोर आले . त्यानंतर विविध एजंटांनी त्यावर स्वतःचे कमिशन जोडत किंमत आणखी वाढवली. विशेष म्हणजे, ही प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली नव्हती. संपूर्ण व्यवहार हार्ड कॉपीच्या माध्यमातून करण्यात आला.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, फरार असलेला मुख्य सूत्रधार बीजेंद्र कुमार गुप्ता हा एखाद्या विशिष्ट परीक्षेला लक्ष्य करत नव्हता. त्याऐवजी विविध राज्यांच्या प्रश्नपत्रिका जिथे छापल्या जातात, त्या गुप्त छापखान्यांतील कर्मचाऱ्यांना पैशांचे आणि इतर आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढत होता. छपाईसाठी कोणतीही प्रश्नपत्रिका आली की ती बाहेर काढून आपल्या कोचिंग नेटवर्कमार्फत विकण्याचा त्याचा पॅटर्न होता.
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली. ज्या छापखान्यात राज्यातील सर्वात गोपनीय प्रश्नपत्रिका छापल्या जात होत्या, तेथील सीसीटीव्ही कॅमेरेच बंद होते. त्यामुळे आरोपींची कोणतीही हालचाल रेकॉर्ड झाली नाही.
TET Exam Paper Leak: भिवंडीतून मिळाली पहिली टिप… आणि उलगडला संपूर्ण कट
२८ जून रोजी होणाऱ्या TET परीक्षेच्या दोन दिवस आधी म्हणजे २६ जून रोजी भिवंडी पोलिसांना पेपरफुटीची गोपनीय माहिती मिळाली. पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली डमी ग्राहक पाठवून सापळा रचण्यात आला. शिक्षण विभागाकडून प्रश्नपत्रिका मूळ असल्याची खात्री होताच कारवाई करण्यात आली. त्यानंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले. बिहार, हरियाणा, दिल्ली आणि आग्रा येथे कारवाया करत या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला.
आतापर्यंत १२ आरोपी जेरबंद
२८ जून :
धीरज बलराज सिंह (हरियाणा)
राजीव शाव (बिहार)
आकाशकुमार सरोजकुमार (बिहार)
२९ जून :
सुमन कुमारी (विजेंद्र गुप्ताची पत्नी, पटना)
२ जुलै :
सोनूकुमार सिंह
मिथुनकुमार सिंह (दोघे समस्तीपूर, बिहार)
कपिल कृष्णा दहिया (सोनीपत, हरियाणा)
४ जुलै :
संजयकुमार सुरेशचंद्र शर्मा
बाबुलाल नारायणसिंह कुशवाह
नरेशकुमार पुरनचंद माहौर उर्फ निक्की (तिघेही आग्रा)
९ जुलै :
नरेशकुमार पवनकुमार अशोककुमार यादव (नवी दिल्ली)
हरिओम रिचपालसिंह पानू (हिस्सार, हरियाणा)
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI