नवी दिल्ली : आपल्या नवनवीन कल्पना आणि देशातील रस्ते वाहतुकीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ओळखले जाणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) सध्या त्यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा देशभरात चर्चेत आले आहेत. उत्तर प्रदेशातील महत्त्वाकांक्षी ‘लखनऊ-कानपूर एक्सप्रेसवे’चे (Lucknow-Kanpur Expressway) उद्घाटन करताना त्यांनी भविष्यातील आपल्या एका मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी प्लॅनचा खुलासा केला आहे. देशात मी आता हवेत उडणारी बस (Flying Bus) आणणार आहे, असे गडकरी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बहुप्रतीक्षित 63 किलोमीटर लांबीचा लखनऊ-कानपूर एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवास प्रचंड सुकर आणि वेगवान होणार आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरींनी त्यांची पुढील संकल्पना स्पष्ट केली.
Nitin Gadkari Speech : हवेत उडणारी बस आणणार
एक्सप्रेसवेच्या उद्घाटन सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले, “मी देशात नेहमीच नवनवीन तंत्रज्ञान (Technology), रोप-वे आणि केबल कार घेऊन आलो आहे. मी यापूर्वी पाण्यात उतरणारे विमान देखील आणले होते. आता माझा पुढचा प्लॅन हवेत उडणारी बस आणण्याचा आहे.”
ते पुढे म्हणाले, “हवेत उडणाऱ्या बससाठी मी मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टम ऑन इलेक्ट्रिसिटी (Electric Mass Rapid Transport System) तयार करून देणार आहे, कारण हा विभाग माझ्याच अखत्यारीत येतो. या तंत्रज्ञानामुळे प्रवासी एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात कधी पोहोचले, हे त्यांचे त्यांनाच कळणार नाही. लवकरच मी याची सुरुवात करणार आहे.”
अब जल्द आ रही हवा में उड़ने वाली बस, केन्द्रीय परिवहन मंत्री ने क्या बोला, खुद सुनिए. #NitinGadkar pic.twitter.com/mr4kRE9VgN
— Rajesh Kumar/राजेश कुमार/راجیش (@rajeshemmc) July 14, 2026
Lucknow Kanpur Expressway Features : ‘लखनऊ-कानपूर एक्सप्रेसवे’चे उद्घाटन
या ऐतिहासिक एक्सप्रेसवेच्या सुरुवातीमुळे लखनऊ आणि कानपूर दरम्यान अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीच्या (Traffic Jam) समस्येतून नागरिकांना मोठी मुक्ती मिळाली आहे. पूर्वी या दोन शहरांमधील अंतर पार करण्यासाठी अडीच ते तीन तास लागायचे. मात्र, आता हा प्रवास अवघ्या 35 ते 45 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. या 63 किलोमीटर लांबीच्या या एक्सप्रेसवेची पायाभरणी 2018 मध्ये झाली होती. हा प्रकल्प सुमारे 4,500 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) या संपूर्ण प्रकल्पाची दोन पॅकेजमध्ये विभागणी केली होती. लखनऊच्या अमौसी आणि शहीद पथ परिसराला जोडणारा सुमारे 18 किलोमीटर लांबीचा ‘एलिवेटेड सेक्शन’ (Elevated Section) होता. सुमारे 45 किलोमीटर लांबीचा ‘ग्रीनफील्ड सेक्शन’ (Greenfield Section) होता, जो लखनऊच्या 11 आणि उन्नावच्या 31 गावांतून जातो.
या प्रकल्पाचा 45 किमीचा ग्रीनफील्ड भाग ऑक्टोबर 2025 पर्यंतच पूर्ण झाला होता. त्यानंतर 2026 च्या सुरुवातीला लखनऊ पॅकेजचे अंतिम काम 99 टक्क्यांपर्यंत पूर्ण करून जून 2026 मध्ये याचा यशस्वी ‘ट्रायल रन’ (Trial Run) घेण्यात आला होता. आज अखेर हा मार्ग जनतेसाठी समर्पित करण्यात आला असून गडकरींच्या उडणाऱ्या बसच्या घोषणेने या सोहळ्याची अधिकच चर्चा रंगली आहे.
ही बातमी वाचा:
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया