कॉलेजात पथकं शिरलं, शिक्षकांचे मोबाईल काढून घेतले, कागदपत्रं चाळली, प्रसिद्ध कॉलेजवर बँकेची मोठी कारवाई! | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

Raigad Karjat News: बँकेने सरफेसी (SARFAESI) कायद्यांतर्गत कारवाई करत चांधई गावच्या सर्व्हे नंबर १८ आणि १९ मधील कॉलेजची संपूर्ण जमीन, भव्य इमारत आणि इतर जंगम मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेतला आहे.

तासगावकर कॉलेजवर मोठी कारवाई
तासगावकर कॉलेजवर मोठी कारवाई

संतोष दळवी, प्रतिनिधी, रायगड : कर्जत तालुक्यातील चांधई येथील नामांकित आणि बहुचर्चित तासगावकर मेडिकल कॉलेज म्हणजेच सरस्वती एज्युकेशन सोसायटीवर आज बँक ऑफ इंडियाच्या ‘स्पेशलाइज्ड अॅसेट रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रँच’ ने तब्बल ७८ कोटी २१ लाख २ हजार ५०४ रुपयांच्या प्रचंड थकबाकीमुळे थेट कॉलेजच्या मुख्य गेटवर कायदेशीर जप्तीची म्हणजेच पझेशन नोटीस चिटकवून संपूर्ण रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली आहे.

कॉलेजमधील शिक्षक विद्यार्थी भेदरले

बँकेचे वरिष्ठ अधिकारी आणि वसुली कर्मचाऱ्यांचे एक मोठे पथक अचानक आज १४ जुलै २०२६ रोजी कॉलेजच्या आवारात दाखल झाले. त्यांनी आत येताच संपूर्ण कॉलेज प्रशासनाला आपल्या ताब्यात घेतले, तसेच या कारवाईची माहिती बाहेर जाऊ नये आणि कोणताही अडथळा येऊ नये म्हणून बँकेच्या पथकाने कॉलेजच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन देखील काढून घेतले. त्यानंतर अनेक तास आतमध्ये कागदपत्रांची कसून चौकशी आणि छाननी सुरू ठेवली, ज्यामुळे कॉलेज परिसरात प्रचंड घबराट आणि नाट्यमय वातावरण निर्माण झाले होते.

बँकेच्या नोटिशीत काय म्हटलंय?

बँकेने लावलेल्या अधिकृत कायदेशीर नोटीसीमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, मुख्य कर्जदार आणि जामीनदार असलेले नंदकुमार यादवराव तासगावकर, सरस्वती एज्युकेशन सोसायटी, डॉ. शशांक रामचंद्र गांगवणे, यादवराव हिराप्पा कांबळे, राजेश यादवराव तासगावकर, वंदना नंदकुमार तासगावकर, सरस्वती यादवराव कांबळे आणि चंद्रशेखर साळगावकर हे सर्वजण बँकेची कोट्यवधी रुपयांची थकीत रक्कम विहित मुदतीत भरण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.

कॉलेजचा प्रत्यक्ष ताबा घेतला

म्हणूनच बँकेने सरफेसी (SARFAESI) कायद्यांतर्गत कारवाई करत चांधई गावच्या सर्व्हे नंबर १८ आणि १९ मधील कॉलेजची संपूर्ण जमीन, भव्य इमारत आणि इतर जंगम मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेतला असून, आता या मालमत्तेशी सार्वजनिक रित्या कोणताही खरेदी-विक्रीचा किंवा इतर व्यवहार करू नये असा कडक इशारा जाहीर नोटीसद्वारे दिला आहे. तर दुसरीकडे कॉलेज सुरू असतानाच बँकेने अचानक केलेल्या या थेट आणि धडक कारवाईमुळे कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शेकडो निष्पाप विद्यार्थी आणि लाखो रुपये फी भरणाऱ्या त्यांच्या पालकांमध्ये आपल्या शैक्षणिक भविष्याबाबत प्रचंड भीती, चिंता आणि संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

कॉलेजात पथकं शिरलं, शिक्षकांचे मोबाईल काढून घेतले, कागदपत्रं चाळली, प्रसिद्ध कॉलेजवर बँकेची मोठी कारवाई!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *