मुंबई : राज्यात पावसाने (Rain) धुमाकूळ घातला असून मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात धुव्वाधार बॅटिंग सुरू आहे. त्यातच, मुंबईत अनेक दुर्घटना घडल्या असून झाडपडीमुळे काहींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. गेल्याच आठवड्यात एका शाळेच्या बसवर झाड कोसळून 10 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली होती. दरम्यान, अद्यापही मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम असून काही ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Thane) शहरात 13 वर्षीय मुलगा नाल्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली असून अहिल्यानगरमध्ये विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.
भिवंडीत आपल्या मित्रांबरोबर नाल्याशेजारी खेळायला गेलेला मुलगा पावसाच्या वाहत्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. त्याच्यासोबत खेळणाऱ्या मित्रांकडून हा मुलगा नाल्यात वाहून बेपत्ता झाल्याचे समजातच परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांनी तात्काळ धाव घेत प्रशासनाला संपर्क साधला. मोहम्मद अबुजर अन्सारी (वय 13 वर्ष) असे नाल्यात वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. अग्निशमन दल आणि मनपा आपात्कालीन पथकाकडून मुलाचा शोध सुरू असून मुलाच्या सुरक्षित असण्यासाठी प्रार्थना केली जात आहे.
झाड कोसळून 10 दुचाकींचे नुकसान
दरम्यान, मुंबईतील चुनाभट्टी येथे झाड कोसळून संरक्षण भिंत खचल्याची देखील घटना समोर आली आहे. चुनाभट्टी विभागातील चुनाभट्टी स्मशानभूमी लगत असलेले दफन भूमि येथील संरक्षण भिंत खचल्याने सदर ठिकाणी असलेले झाड कोसळून 10 ते 12 मोटारसायकलचे नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी संबंधित विभाग, वृक्ष प्राधिकरण अधिकारी व कर्मचारी पोहोचले असून कोसळलेले झाड ट्रेमिंग करण्यात आले आहे.
अहिल्यानगरमध्ये चिमुकलीचा मृत्यू
अहिल्यानगर शहरातील स्टेशन रोड परिसरात विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने चार वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. प्रियंका गांगर्डे असे मृत चिमुरडीचे नाव आहे. अहिल्यानगरमध्ये कालपासून संततधार पाऊस सुरू आहे, त्यातच विद्युत खांबात वीजप्रवाह उतरल्याने त्याच खांबाला स्पर्श होऊन प्रियंकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून चिमुकलीचा मृत्यू झाल्याने महावितरण विरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आक्रमक झाला आहे, महावितरणाच्या कार्यालयात राष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत दोषी अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.
हेही वाचा
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी