Last Updated:
महाडला जोडणारे सर्वच्या सर्व पाच प्रमुख रस्ते आणि घाट रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाले आहेत.
रायगड : गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे महाड शहराची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, महाडला जोडणारे सर्वच्या सर्व पाच प्रमुख रस्ते आणि घाट रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाले आहेत. यामुळे महाड शहराचा संपर्क संपूर्णपणे तुटला असून प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे.
मुसळधार पावसामुळे रायगडमधील वाहतूक यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. सावित्री नदीच्या पुराच्या पाण्याचा मोठा विळखा महाड शहराला बसला असून अनेक ठिकणी परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. अनेक दुकाने पाण्याखाली गेल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आजूबाजूची भातशेतीही पूर्णपणे जलमय झाली आहे. हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या अशा दोन दिवसांचा ‘रेड अलर्ट’जारी केला आहे.
- मुंबई – महाड – गोवा राष्ट्रीय महामार्ग: महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने आणि काही भागांत रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे रोखण्यात आली आहे.
- महाड – पुणे (वरंध / भोर घाट): मुसळधार पावसामुळे घाटात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्या आहेत. दरड काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी धोका कायम असल्याने मार्ग बंद आहे.
- महाड – पुणे (ताम्हिणी घाट): ताम्हिणी घाटात दृश्यमानता अत्यंत कमी झाली असून, काही ठिकाणी रस्ते खचल्याने हा मार्गही सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे.
- महाड – महाबळेश्वर (आंबेनळी घाट): प्रचंड पावसामुळे आंबेनळी घाटात दगड आणि माती रस्त्यावर आली आहे. खोल दरी आणि कोसळणाऱ्या दरडींमुळे हा घाटही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
- महाड – दापोली रस्ता: कोकणात जाणाऱ्या या अंतर्गत आणि महत्त्वाच्या मार्गावरही पूर परिस्थिती निर्माण झाल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे.
शहरात पाणी शिरले
महाडमधून वाहणाऱ्या सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नद्यांचे पाणी महाड शहरात आणि आजूबाजूच्या सखल भागात वेगाने शिरत आहे. बाजारपेठ, मुख्य रस्ते आणि निवासी संकुलांच्या तळमजल्यांवर पाणी साचल्याने नागरिक घरातच अडकून पडले आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नये
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे कडक आवाहन केले आहे. महाडमधील परिस्थिती सध्या अत्यंत गंभीर आहे. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून मदत आणि बचाव यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. एनडीआरएफ (NDRF) आणि स्थानिक रेस्क्यू टीम्स सज्ज ठेवण्यात आल्या असून, पाणी ओसरल्यानंतर आणि घाट रस्ते सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Raigad,Maharashtra
