Chain kuli ki main kuli fame actor: एकेकाळी आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे अनेक बालकलाकार आज रुपेरी पडद्यापासून पूर्णपणे दूर गेले आहेत. काहींनी अभिनयातच करिअर केलं, तर काहींनी वेगळी वाट निवडली. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चेन कुली की मेन कुली’ या चित्रपटातील करणची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला झैन खानही (zain khan) अशाच कलाकारांपैकी एक आहे. बालवयात लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या या अभिनेत्याने अचानक अभिनयक्षेत्र सोडलं आणि आता तो पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे.
बालकलाकार म्हणून गाजला, पण अचानक घेतला मोठा निर्णय
झैन खानने लहान वयातच बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. नैसर्गिक अभिनयामुळे त्याचं कौतुक झालं आणि भविष्यात तो मोठा अभिनेता बनेल, अशीही चर्चा होती. मात्र, अभिनयात चांगली संधी मिळत असतानाच त्याने 2010 च्या सुमारास चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो कोणत्याही चित्रपटात किंवा मालिकेत दिसला नाही. आज झैन सोशल मीडियावरही फारसा सक्रिय नसून ग्लॅमरच्या झगमगाटापासून दूर राहणं त्याने पसंत केलं आहे.
आता कॉर्पोरेट क्षेत्रात करतोय काम
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेडिटवरील एका पोस्टमधून झैन खानच्या लिंक्डइन प्रोफाइलची माहिती समोर आली. त्यानुसार, तो सध्या PhonePe मध्ये सेल्स हेड म्हणून कार्यरत असून मुंबईत वास्तव्यास आहे. यापूर्वी त्याने झोमॅटो आणि पेटीएम यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्येही काम केलं आहे. दरम्यान, त्याचा लूकही आता पूर्णपणे बदलला असून तो कॉर्पोरेट क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवत आहे.
View this post on Instagram
अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये झळकला
‘चेन कुली की मेन कुली’ या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटामुळे झैन खानला खरी ओळख मिळाली. त्यानंतर त्याने ‘परिणीता’, ‘चान्स पे डान्स’ आणि ‘माय वाइफ्स मर्डर’ यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. याशिवाय लोकप्रिय टीव्ही मालिका ‘जस्सी जैसा कोई नहीं’ मध्येही त्याने काम केलं होतं. बालकलाकार म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या झैन खानने अभिनयाऐवजी कॉर्पोरेट क्षेत्राची वाट निवडली असली, तरी आजही ‘चेन कुली की मेन कुली’मधील त्याची भूमिका अनेकांच्या आठवणीत कायम आहे.