Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर


नाशिक : महाराष्ट्रात पावसाने रुद्र रूप (Maharashtra Heavy Rain) धारण केले असून नाशिक जिल्ह्यासाठी उद्याचा दिवस (7 July) धोक्याची घंटा ठरणार आहे. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी केला असून अत्यंत भीषण म्हणजेच ढगफुटीसदृश अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीसह जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये मंगळवारी बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत.

त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक शहरात पावसाचा जोर सर्वाधिक असण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं सर्व यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवलं आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले असून नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

Nashik Cloudburst Warning : त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीत 300 मिमी पावसाचा अंदाज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या आपत्कालीन आढावा बैठकीत नाशिकच्या परिस्थितीबाबत मोठी चिंता व्यक्त केली होती. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि दिंडोरी तालुक्यांमध्ये ढगफुटीसारखा पाऊस होऊ शकतो. विशेषतः त्र्यंबकेश्वर आणि आजूबाजूच्या परिसरात तब्बल 300 मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या गंभीर इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ पावलं उचलत आपत्ती व्यवस्थापन पथकं तैनात केली आहेत. सखल भागात आणि गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये पाणी साचू नये, यासाठी पालिका आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी मैदानावर उतरले आहेत.

Trimbakeshwar Temple Closed : त्र्यंबकेश्वर आणि सप्तश्रृंगी मंदिर भाविकांसाठी बंद

पावसाची भीषणता लक्षात घेता केवळ शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली नाही, तर जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळे देखील सुरक्षेचा उपाय म्हणून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध अकरावे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Temple) आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले सप्तश्रृंगी निवासिनी देवी देवस्थान (Saptashrungi Temple) सोमवारी सायंकाळपासून बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

घाट रस्ते, दरडी कोसळण्याची शक्यता असलेले मार्ग आणि पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. जीवितहानी टाळण्यासाठी हे कडक निर्णय घेण्यात आले असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे. 

ही बातमी वाचा: 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *