Alpha Box Office Collection Day 3: आलिया भट्ट, शर्वरी वाघ, अनिल कपूर आणि बॉबी देओल अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘अल्फा’ (Alpha) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. सुरुवातीला संथ गतीने सुरू झालेल्या या चित्रपटाला वीकेंडचा मोठा फायदा झाला असून, तिसऱ्या दिवशी कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे.( Box office collection)
तिसऱ्या दिवशी किती झाली कमाई?
‘अल्फा’ प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक आणि समीक्षकांकडून त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पहिल्या दिवशी चित्रपटाने अपेक्षेपेक्षा कमी कमाई केली. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 9.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आणि त्याने 11.50 कोटी रुपये गल्ला केला. रविवारी सुट्टीचा फायदा चित्रपटाला मोठ्या प्रमाणात झाला. सॅकनिल्कच्या माहितीनुसार, रात्री 10.30 वाजेपर्यंत ‘अल्फा’ने 13.25 कोटी रुपयांची कमाई केली. यासह चित्रपटाचे भारतातील नेट कलेक्शन 34 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
यंदा रिलीज झालेल्या 10 चित्रपटांना मागे टाकलं
‘अल्फा’ने ओपनिंग वीकेंडमध्ये दमदार कमाई करत जवळपास 35 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. तसेच, जागतिक बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने 50 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. यासह ‘अल्फा’ने 2026 मधील अनेक चित्रपटांच्या संपूर्ण भारतातील लाइफटाइम कमाईलाही मागे टाकले आहे.
हाँटेड 3D – 18.69 कोटी
भारत भाग्य विधाता -7.01 कोटी
पेड्डी -22.46 कोटी
चांद मेरा दिल – 31.14 कोटी
अस्सी – 11.42 कोटी
गव्हर्नर – 6.21 कोटी
बंदर – 4.18 कोटी
राहू केतू -6.37 कोटी
हॅपी पटेल – 6.20 कोटी
वध 2 – 3.83 कोटी
लाइफटाइम कलेक्शनसोबतच ‘अल्फा’ने ओपनिंग वीकेंड कमाईच्या बाबतीतही अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. यात ‘मर्दानी 3’ सारख्या चित्रपटांचाही समावेश आहे.
पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद
अल्फा या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे लेखन अभिनेता उदय चोप्रा यांनी केले असून या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे. ‘द रेल्वे मॅन’ फेम शिव रावळ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात आलिया आणि शर्वरी यांच्या व्यतिरिक्त अनिल कपूर आणि बॉबी देवल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ऋतिक रोशनने या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. Yrf स्पाय युनिव्हर्समधील हा सातवा चित्रपट आहे. यापूर्वी yrf ची निर्मिती असलेले वर पठाण, टायगर 3, टायगर जिंदा है, एक था टायगर, वॉर 2 या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सगळ्या चित्रपटांची पहिल्या दिवसाची कमाई 30 कोटी ते 60 कोटी रुपयांपर्यंत गेली होती. मात्र, हा एकमेव असा चित्रपट आहे जो 9 कोटींवरच अडकला. मात्र, विकेंडचा चांगला फायदा या चित्रपटाला झालाय.