EPFO :  ईपीएफओची वेबसाईट अखेर सुरु, UAN संदर्भात मोठा बदल, यूएएन तयार करणे,सक्रिय करण्याची सुविधा वेबसाईटवरुन बंद


नवी दिल्ली : ईपीएफओची वेबसाईट, यूएएन पोर्टल आणि ई पासबूक पोर्टल गेल्या सात दिवसांच्या कालावधीत अपग्रेडेशनसाठी बंद होतं. 3 जुलै म्हणजे आजपासून ईपीएफओची वेबसाईट आणि  यूएएन मेंबर पोर्टल, ई पासबूक पोर्टल सुरु झालं आहे. कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि चांगल्या ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन देणे हा या अपग्रेडेशनचा उद्देश होता. मात्र, या अपग्रेडेशननंतर यूएएन क्रमांक सक्रिय करणे आणि यूएएन क्रमांक अलॉट करण्याची सुविधा यूएएन मेंबर पोर्टलवर उपलब्ध नसेल. या दोन्ही सुविधा वापरण्यासाठी आता कर्मचाऱ्यांना उमंग ॲपचा वापर करावा लागेल.

ईपीएफओच्या मेंबर पोर्टल वेबसाईटवर UAN  सक्रिय करणे आणि नवा UAN क्रमांक तयार करण्याची पूर्ण सुविधा UMANG App वर शिफ्ट करण्यात आल्या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याला UAN सक्रिय करायचा असेल किंवा UAN तयार करायचा असेल तर उमंग ॲपचा वापर करावा लागेल. या प्रक्रियेत आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनचा वापर करावा लागेल.     

उमंग ॲपवर UAN सक्रिय करावा लागणार

जर तुमचा UAN क्रमांक सक्रिय नसेल तर सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलमध्ये उमंग ॲप डाऊनलोड करावं लागेल.  यानंतर उमंग ॲप ओपन करुन ईपीएफओ सर्व्हिसेसमध्ये जावं लागेल. जिथं UAN Services Through Face Auth  मध्ये UAN Activation हा पर्याय निवडावा लागेल. यानंतर निर्देशांचं पालन करत आधार बेस्ड फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करावं लागेल. 

आता नवा UAN क्रमांक तयार करायचा असेल तर त्यासाठी देखील उमंग ॲपचा वापर केला जाणार असेल. UAN Allotment and Activation पर्याय निवडावा लागेल. आवश्यक ती माहिती भरुन मोबाईल क्रमांक पडताळणी करुन आधार बेस्ड फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करावं लागेल. 

अपडेटेड पोर्टलवर UAN Retrieval ची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. जर तुम्हाला UAN क्रमांक आठवत नसेल तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक नोंदवावा लागेल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रं अपलोड केल्यानंतर मोबाईल क्रमांकावर ओटीपी क्रमांक येईल, तो नोंदवून UAN  क्रमांक मिळू शकतो. 

डेथ क्लेमची सुविधा यूनिफाइड मेंबर पोर्टलवर पहिल्या प्रमाणं उपलब्ध असेल. नामांकित व्यक्ती किंवा लाभार्थी पेन्शन आणि इतर दाव्यांसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. यासाठी लाभार्थ्याचा आधार क्रमांक मोबाइल नंबर सोबत लिंक असला पाहिजे. बँक खात्याची माहिती तयार असली पाहिजे. अर्जासोबत मृत्यू प्रमाणपत्र, बँक पासबूक आणि कॅन्सल केलेला चेक, जन्मतारखेचा पुरावा यासारखी कागदपत्रं पीडीएफमध्ये अपलोड करावी लागतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *