PM मोदीही या सरकारी योजनेत गुंतवतात पैसे, फक्त व्याजातून होते लाखोंची कमाई – Marathi News | Pm modi invests in post office nsc scheme high interest safe investment benefits


आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य वेळी योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करणे महत्त्वाचे असते. कारण कधीही कोणतीही अडचण येऊ शकते. अशा अडचणीच्या काळात बचत आणि गुंतवणूक आवश्यक आहे. जर तुम्हीही तुमच्या कष्टाच्या पैशांसाठी सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी योजना शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) ही योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. महत्त्वाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या योजनेत गुंतवणूक केली आहे. या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना

पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना सुरक्षिततेसह आकर्षक परताव्यासाठी ओळखली जाते. ही योजना भारत सरकार आणि पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाते. त्यामुळे बाजारातील चढ-उतारांचा यावर कोणताही परिणाम होत नाही. या योजनेत 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. मात्र गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही, त्यामुळे तुम्ही कितीही रक्कम यात गुंतवू शकता.

किती मिळतो परतावा?

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेवर सध्या वार्षिक 7.7 टक्के व्याजदर मिळतो. हे व्याज दरवर्षी चक्रवाढ पद्धतीने जोडले जाते. म्हणजेच, पहिल्या वर्षी मिळालेल्या व्याजासह वाढलेल्या रकमेवर पुन्हा व्याज मिळते. या योजनेचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 लाख रुपये या योजनेत 5 वर्षांसाठी गुंतवले, तर मुदतपूर्तीनंतर त्याला 7,24,517 रुपये मिळतील. म्हणजेच 2,24,517 रुपयांचा परतावा मिळतो.

कर सवलतही मिळते

पोस्ट ऑफिसच्या NSC योजनेत कर सवलतीचाही फायदा मिळतो. जुन्या करप्रणालीत या योजनेत केलेल्या 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत करसवलत मिळते. या योजनेतील वार्षिक व्याज आपोआप पुन्हा गुंतवले जात असल्याने पहिल्या चार वर्षांच्या व्याजावर कर लागत नाही. मात्र, पाचव्या वर्षी मुदतपूर्तीनंतर मिळणाऱ्या व्याजावर कर लागू होतो.

PM मोदींचीही गुंतवणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) योजनेत गुंतवणूक केलेली आहे. मोदींनी या योजनेत 9.12 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी त्यांच्या NSC मधील गुंतवणुकीची रक्कम 7.61 लाख रुपये होती, जी आता वाढून 9.12 लाख रुपये झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *