आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने या अत्यंत निषेधार्ह घटनेकडे अपवादात्मक घटना म्हणून पाहून मंदिराच्या प्रशासन आणि व्यवस्थापनातील सर्व त्रुटी दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. या उपाययोजनांमुळे भगवान श्रीराम यांच्या कोट्यवधी भक्तांचा अयोध्येतील राम मंदिरावरील विश्वास आणि श्रद्धा अबाधित राहील. सध्या निर्माण झालेला संभ्रम आणि अनिश्चिततेची स्थिती संपली पाहिजे, अशी संघाची अपेक्षा आहे.
श्री रामलला मंदिरातील देणगीपेट्यांमध्ये जमा झालेल्या पैशांची चोरी झाल्याची दुर्दैवी घटना संपूर्ण समाजाच्या आणि भगवान श्रीराम यांच्या लाखो-कोट्यवधी भक्तांच्या भावना व श्रद्धेला मोठा धक्का देणारी आहे. या घटनेमुळे आम्ही सर्वजण अत्यंत दुःखी आणि व्यथित आहोत, आरएसएसने म्हटले आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या विनंतीवरून उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून, प्राथमिक तपास अहवालाच्या आधारे कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. तपासादरम्यान जो कोणी दोषी आढळेल, त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, असे देखील संघाने म्हटले आहे.
संघाने मंदिर व्यवस्थापन आणि सरकारने नियुक्त केलेल्या एसआयटीकडून सर्व आवश्यक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सक्षम आर्थिक व्यवस्थापन, कार्यक्षम प्रशासन, पारदर्शक आणि उत्तरदायी व्यवस्था तसेच पावित्र्य, शुचिता आणि धार्मिक मूल्यांनी परिपूर्ण वातावरणाच्या माध्यमातून श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट हिंदू समाजाचा विश्वास अधिक दृढ करेल, असा विश्वास संघाने व्यक्त केला आहे.
आरएसएसने संपूर्ण हिंदू समाजाला या कठीण काळात संयम आणि धीर राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच या दुर्दैवी घटनेचा गैरफायदा घेऊन हिंदू धर्म आणि हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हिंदूविरोधी आणि राष्ट्रविरोधी शक्तींचे प्रयत्न हाणून पाडावेत, असेही संघाने म्हटले आहे.
संघाचे हे निवेदन महत्त्वाचे मानले जात आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा वैचारिक मार्गदर्शक असून अनेक दशकांपासून चालत आलेल्या रामजन्मभूमी आंदोलनाचा प्रमुख आधारस्तंभ मानला जातो.
राम मंदिरातील देणगीच्या कथित अपहाराचे प्रकरण 7 जून रोजी उघडकीस आले होते. उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या प्राथमिक अहवालाच्या आधारे 25 जून रोजी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत मंदिरातील देणगी मोजण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने प्राथमिक तपासात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता आढळल्याने श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मागील पाच वर्षांच्या आर्थिक व्यवहारांचे फेरलेखापरीक्षण (Re-audit) करण्याचा निर्णय घेतला आहे.
या फेरलेखापरीक्षणामध्ये मंदिराच्या बांधकामावरील खर्च, तसेच देणगी म्हणून मिळालेले सोने, चांदी, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचीही सखोल तपासणी केली जाणार आहे. ट्रस्टच्या मागील पाच वर्षांतील सर्व आर्थिक नोंदींचे बारकाईने परीक्षण केले जाईल.
या प्रकरणातील प्रमुख आरोपी अविनाश शुक्ला याला ताब्यात घेऊन अयोध्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. यापूर्वी एसआयटीने ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय, विश्वस्त अनिल मिश्रा आणि मंदिराच्या बांधकाम व व्यवस्थापनाशी संबंधित गोपाल राव यांचीही चौकशी केली आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार तपासादरम्यान अविनाश शुक्ला याच्याकडून 20.39 लाख रुपये, करुणेश पांडे याच्याकडून 18.07 लाख रुपये, अनुकल्प मिश्रा याच्याकडून 16.82 लाख रुपये, लवकुश मिश्रा याच्याकडून 14.25 लाख रुपये, रामाशंकर मिश्रा याच्याकडून 7.32 लाख रुपये आणि रामाशंकर यादव उर्फ टिन्नू याच्याकडून 1 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
याशिवाय सुमारे 11 ग्रॅम सोने, सुमारे 375 ग्रॅम चांदी आणि 1,121 अमेरिकन डॉलरही पोलिसांनी जप्त केले आहेत.
तपासादरम्यान अयोध्येतील एका योग केंद्रातून ‘रामराज्य कोष’ असे लिहिलेली आणि पेटीएम क्यूआर कोड असलेली देणगीपेटीही जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अविनाश शुक्ला जवळपास दहा वर्षांपासून या योग केंद्रात वास्तव्यास होता. या सर्व बाबींचा तपास एसआयटीकडून सुरू असून आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती आणि त्यामागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी चौकशी सुरू आहे.