India VS England 2nd T20 : मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे आता या मालिकेत अवघे चारच सामने शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतीय संघाची प्लेइंग-11 कशी असेल आणि युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वैभव सूर्यवंशीला संधी मिळाल्यास संजू सॅमसन संघाबाहेर?
सध्या भारतीय क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा आहे, ती म्हणजे वैभव सूर्यवंशीचे पदार्पण. सध्याच्या घडीला अनेक दिग्गज माजी खेळाडू वैभवला संघात सामील करण्याची मागणी करत आहेत. जर वैभवला प्लेइंग-11 मध्ये स्थान द्यायचे असेल, तर खराब फॉर्ममध्ये असलेल्या संजू सॅमसनला प्लेइंग-11 मधून बाहेर बसावे लागू शकते. अभिषेक शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याचे सलामीचे स्थान पक्के आहे. अशा परिस्थितीत वैभव सूर्यवंशी संघात आल्यास तो अभिषेकसोबत सलामीला उतरेल. मात्र, टी-20 वर्ल्ड कपमध्ये चमकलेल्या संजू सॅमसनला संघ व्यवस्थापन इतक्या लवकर डच्चू देणार का, हा मोठा प्रश्न आहे.
टॉप 3 मध्ये डाव्या हाताच्या फलंदाजांची रणनीती उलटवू शकते का?
जर संजू सॅमसनच्या जागी वैभव सूर्यवंशीला संधी दिली, तर भारताच्या टॉप-3 मध्ये अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी आणि इशान किशन असे तीनही डाव्या हाताचे फलंदाज असतील. ही रणनीती भारतीय संघावर उलटवू शकते, कारण इंग्लंडच्या संघात विल जॅक्स, लियाम डॉसन आणि आदिल रशीद यांसारखे दर्जेदार फिरकीपटू आहेत, जे डाव्या हाताच्या फलंदाजांना अडचणीत आणू शकतात. त्यामुळे केवळ सांघिक संतुलनाचा विचार करून वैभवला पदार्पणासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते.
मँचेस्टरमध्ये भारत 3 फिरकीपटूंसह उतरणार?
पहिल्या टी-20 सामन्यात भारताने अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई अशा तीन फिरकीपटूंना संधी दिली होती. मँचेस्टरच्या खेळपट्टीवर मधल्या षटकांमध्ये फिरकीला नक्कीच मदत मिळते, मात्र ऐतिहासिकदृष्ट्या ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अधिक अनुकूल मानली जाते. जर भारतीय संघाने येथे दोनच फिरकीपटूंसह उतरण्याचा निर्णय घेतला, तर रवी बिश्नोईच्या जागी वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवला प्लेइंग-11 मध्ये संधी मिळू शकते.
भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग-11 : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन/वैभव सूर्यवंशी, इशान किशन (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई/प्रिन्स यादव.
इंग्लंडचा संभाव्य प्लेइंग-11 : फिल सॉल्ट, जोस बटलर (यष्टिरक्षक), हॅरी ब्रूक (कर्णधार), विल जॅक्स, जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन, साकिब महमूद.
हे ही वाचा –