बेळगाव : प्रवास कुठलाही असो आपल्या सुरक्षेची काळजी घेणे महत्त्वाचे असते, मग आपण विमानातून फिरत असोत, रेल्वेमधून किंवा एसटी बसमधून जात असो. कारण, अपघात कधीच सांगून होत नाही, अशीच धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. धावत्या बसच्या (Bus accident) खिडकीतून गुटखा थुंकण्यासाठी डोके बाहेर काढलेल्या 17 वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा बाजूने जाणाऱ्या लॉरीला धडक (Accident) लागून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना धारवाड जिल्ह्यातील कुंदगोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
बेळगावशेजारील धारवाड जिल्ह्यातील कुंदगोळ गावातीन ह्रदयद्रावक घटना समोर आली असून बसमधून डोकं बाहेर काढल्याने एका विद्यार्थ्याला हाकनाक जीव गमावावा लागला आहे. मृत विद्यार्थ्याची ओळख फक्कीरेश चन्नय्या मुत्तळीमठ (वय 17, रा. शिरूर) अशी झाली असून, तो आयटीआयचे शिक्षण घेत होता. येथील लक्ष्मेश्वर डेपोची केए-26 एफ-1039 क्रमांकाची केएसआरटीसी कर्नाटक महामंडळाची बस प्रवाशांना घेऊन जात असताना हा अपघात झाला.
प्राथमिक माहितीनुसार, केए-04 एडी-7218 क्रमांकाची एम- वाळू वाहतूक करणाऱ्या लॉरी बसला ओव्हरटेक करत होती. त्याचवेळी फक्कीरेशने बसच्या खिडकीतून थुंकण्यासाठी डोके बाहेर काढले. याच क्षणी त्याच्या डोक्याला लॉरीची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुंदगोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला तसेच वाहतूक सुरळीत केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनं कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या