हिंगोली : शासनाने विविध नागरिकांसाठी प्रवासात सवलत दिली असून काहींना मोफत प्रवास देण्यात येत आहे. मात्र, हिंगोली (Hingoli) शहरातील बसस्थानकात आज मोफत तिकीट देण्याच्या कारणावरून प्रवाशाचा वाद झाला. प्रवाशाने आपल्या साथीदारासह वाहकाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बसमधील (Bus) काही प्रवाशांनी एसटी बसच्या वाहकावर धारदार शस्त्र आणि पंचने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात वाहक गंभीर जखमी झाला असून संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी बससेवा बंद ठेवत कामबंद आंदोलन सुरू केले.
आपल्या नियोजित बसची फेरी पूर्ण करुन एक एसटी बस हिंगोली बसस्थानकात दाखल होत असताना मोफत तिकीट देण्याच्या कारणावरून वाद झाला आहे. संबंधित प्रवासी शासनाने निश्चित केलेल्या पात्रतेच्या निकषात बसत नसल्याने वाहकाने मोफत तिकीट देण्यास नकार दिला. याच कारणावरून बसमध्ये प्रवासी आणि वाहकामध्ये शाब्दिक वाद झाला. दोघांमधील हा वाद काही क्षणांतच विकोपाला गेला. संबंधित प्रवाशाने आपल्या साथीदारांना बोलावून वाहकावर धारदार शस्त्र तसेच पंचने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात वाहक गंभीर जखमी झाला असून त्याच्या अंगातून रक्तस्त्राव होत असल्याचेही दिसून आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला असून सध्या हा व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणी, आगारातील सर्वच बस कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बसमध्ये दोघांमध्ये राडा, कर्मचाऱ्यास मारहाण
अकोट ते अकोला चालणाऱ्या खासगी हमसफर ट्रॅव्हल्समधील कर्मचाऱ्याने बसमधील त्याच्याच सहकाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होती. 30 जून रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अकोला रेल्वे स्थानक परिसरात बस आलेली असताना ही घटना घडली. बसचा कंडक्टर रियाजोद्दीन उर्फ रियाजुल गंजा याने सहायकाला हाताने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत शिवीगाळ केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाल्याचा दावा करण्यात आला. तसेच बेशुद्ध अवस्थेतील सहायकास बसमधून खाली उतरवून बस तेथून निघून गेल्याचाही आरोप होत आहे. दरम्यान, संबंधित बसचे परमिट, फिटनेस, विमा आणि करासह आवश्यक कागदपत्रे कालबाह्य असल्याची तक्रार परिवहन विभागाकडे प्रलंबित आहे. याप्रकरणी सदर बसवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
हेही वाचा
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी