Mumbai Rain Updates: मुंबईत मागील 24 तासांत अतिवृष्टी, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं, तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने; रस्तेही पाण्याने तुडुंब


Mumbai Rain Updates: मुंबईत मागील 24 तासांत अतिवृष्टी सारखा पाऊस (Mumbai Rain Updates) कोसळला आहे. सांताक्रुझ वेधशाळा केंद्रावर मागील 24 तासांत 204.6 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. कुलाबा केंद्रावर मागील 24 तासांत 158.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. आज देखील दिवसभर मुंबईत पावसाचा जोर कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वे सेवेलाही बसू लागला आहे. शहरातील अनेक सखल भागांप्रमाणेच काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या सध्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिला आणि ट्रॅकवरील पाण्याची पातळी वाढली, तर लोकल वाहतुकीवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. (Mumbai Local Train Marathi News)

पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी भरलं- (Mumbai Rain Updates)

सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी भरलं आहे. दादर किंग्ज सर्कल, चुनाभट्टी, कुर्ला या भागात पाणी साचल्यामुळे वाहनांना आणि नागरिकांना रस्त्यावरून चालताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सायन, वडाळा, माटुंगा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे महानगरपालिका कर्मचारी ज्या ठिकाणी मॅनहोल आहेत त्याठिकाणी उपस्थित असून पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार- (Mumbai Rain Marathi News)

मरीन ड्राईव्ह परिसरात पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर दाखल झाले आहेत. आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. दुपारी 1.45 च्या सुमारास 4.4 मीटर इतक्या उंच लाटा समुद्रात उसळतील, अशात पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

वांद्रे ते दहिसर या संपूर्ण पट्ट्यात मुसळधार पाऊस- (Mumbai Rain Latest Marathi News)

पूर्व उपनगरांप्रमाणेच पश्चिम द्रुतगती मार्गावरही जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळची वेळ असल्याने सध्या या मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू आहे. मात्र, कार्यालयीन वेळ जसजशी वाढेल आणि पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. वांद्रे ते दहिसर या संपूर्ण पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू असून वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून परिस्थितीवर प्रशासनाचं लक्ष आहे.

मुंबईतील मागील 24 तासांत पावसाची आकडेवारी- (Maharashtra Rain Updates)
(सकाळी 8.30 पर्यंत) 

  • महाबळेश्वर- ८२.८ मिमी 
  • रत्नागिरी – ११४.७ मिमी 
  • सांताक्रुज – २०४.६ मिमी 
  • कुलाबा – १५८.२ मिमी 
  • संभाजीनगर – ४३.२ मिमी 
  • नवी मुंबई – २०६.६ मिमी 
  • डहाणू – १९२.७ मिमी 
  • माथेरान – २०८ मिमी

मुंबईच्या धरणांतील पाणीसाठ्यात सलग दुसऱ्या दिवशी वाढ; साठा 8.12 टक्क्यांवर (Mumbai Water Marathi News)

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात सलग दुसऱ्या दिवशी वाढ नोंदवण्यात आली आहे. काल धरणांतील एकूण पाणीसाठा 7.18 टक्के होता. त्यात आज वाढ होऊन साठा 8.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे सातही धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम एकूण पाणीसाठ्यावर दिसून येत असून, सलग दुसऱ्या दिवशी साठ्यात वाढ झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, पाणीसाठ्यात वाढ होत असली तरी तो अद्याप समाधानकारक पातळीवर पोहोचलेला नाही. त्यामुळे धरण क्षेत्रात आगामी काळातही चांगला आणि सातत्यपूर्ण पाऊस होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे.

मुंबईत जोरदार पाऊस, VIDEO:

संबंधित बातमी:

Mumbai Rains Latest Upates: पावसामुळे लोकल वाहतुकही खोळंबली, दक्षिण मुंबईवर काळ्या ढगांचे सावट, समुद्रात उंच लाटा; संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *