मुंबई/पुणे : खाकी वर्दी म्हटली की सर्वसामान्य नागरिकांमध्ये, विशेषतः लहान मुलांमध्ये एक प्रकारचा आदरयुक्त दरारा आणि भीती पाहायला मिळते. मात्र, याच खाकी (Police) वर्दीच्या पाठीमागे एक हळवं आणि संवेदनशील मन दडलेलं असतं, याची प्रचिती देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. अंमली पदार्थ विरोधी सप्ताहानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांच्या निरागस हट्टापायी पोलीस यंत्रणेचा एक वेगळाच आणि कमालीचा संवेदनशील चेहरा समोर आला आहे. कार्यक्रम संपवून परतणाऱ्या अधिकाऱ्याला घेरून मुलांनी थेट हातावर स्वाक्षरी मागितल्याचा एक हृदयस्पर्शी प्रसंग सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
सध्या सेल्फीचा जमाना आहे, मग गावचा सरपंच असो किंवा देशाचे पंतप्रधान, रिल्सस्टार असो किंवा सुपरस्टार अभिनेता, प्रत्येकजण सेल्फी घेऊन तो क्षण कॅमेऱ्यात कैद करतो. सध्याच्या झेन जी पिढीला तर सेल्फीशिवाय, सेलिब्रिटी माहितीच नसतील. मात्र, पुण्यातील एका शाळेतील मुलींनी चक्क ऑटोग्राफ मागत हात पुढे केल्याने वेगळंच चित्र पाहायला मिळालं. सेल्फीच्या जमान्यातही 90 s आणि जुन्या सेलिब्रिटींचा काळ सर्वांसमोर उभा केला.
पोलीस बँडच्या सुरांनी जिंकली मुलांची मने
‘अंमली पदार्थ विरोधी सप्ताह’ आणि ‘डॉक्टर्स डे’चे औचित्य साधून एका शाळेत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये परिसरातील नामांकित डॉक्टरांचा विशेष सत्कार करण्यात आला. यानंतर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे पोलीस बँडचे सादरीकरण. पोलीस बँडच्या पथकाने एकापाठोपाठ एक अशा सुमधूर देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध केले. उपस्थित शालेय विद्यार्थ्यांनी या संगीताचा आणि देशभक्तीपर सुरांचा मनमुराद आनंद घेतला. अनेक मुलांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच पोलीस अधिकारी आणि पोलीस बँडला इतक्या जवळून पाहिले होते. त्यामुळे खाकी वर्दी आणि शिस्तीचे वादन प्रत्यक्ष डोळ्यांसमोर अनुभवताना मुलांच्या चेहऱ्यावरील कौतुक आणि आनंद गगनात मावेनासा झाला होता.
चिमुकल्यांनी हातात दिला पेन
खरा भावनिक आणि रंजक प्रसंग कार्यक्रम संपल्यानंतर घडला. कार्यक्रम आटोपून पोलीस अधिकारी उमेश गित्ते हे बाहेर पडत असताना, काही मुले सहजपणे त्यांच्याजवळ आली. मुलांनी अत्यंत निरागसपणे आपल्या हातातील पेन गित्ते यांच्या हातात दिला आणि हात पुढे करत साद घातली सर, ‘ऑटोग्राफ प्लीज’. त्या चिमुकल्यांनी जेव्हा पेन हातात देऊन ऑटोग्राफ मागितला, तेव्हा क्षणभर मी सुद्धा गोंधळलो. पण ही मुलं त्यांच्या लहानशा तळहातावर माझी स्वाक्षरी मागत आहेत हे लक्षात आल्यावर मी एका क्षणाचाही विलंब न करता हसतमुखाने सर्वांच्या हातावर स्वाक्षऱ्या केल्या. सही घेतलेली मुलं आनंदाने ती इतरांना दाखवत होती आणि बघता बघता इतरही मुलं सही घेण्यासाठी गर्दी करू लागली. काही काळासाठी मी सुद्धा एका सेलिब्रिटी असल्याच्या आविर्भावातून बाहेर पडलो.
खाकी वर्दीतला संवेदनशील ‘माणूस’
काही वेळातच तिथे उपस्थित असलेल्या सर्वच मुलांनी स्वाक्षरी घेण्यासाठी एकच गर्दी केली. गित्ते यांनीही मुलांचा हिरमोड न करता अगदी हसतमुख चेहऱ्याने प्रत्येकाच्या तळहातावर स्वाक्षरी दिली. सही मिळालेली मुले अभिमानाने आणि आनंदाने आपल्या मित्रांना ती सही दाखवत सुटली होती. पोलीस आणि जनतेमधील, विशेषतः लहान मुलांमधील अंतर कमी करण्यासाठी आणि एक हक्काचा मित्र म्हणून पोलिसांची ओळख निर्माण होण्यासाठी असे प्रसंग अत्यंत महत्त्वाचे ठरतात. सोशल मीडियावर उमेश गित्ते यांनी शेअर केलेली ही आठवण सध्या नेटकऱ्यांच्या कमालीची पसंतीस उतरत असून, खाकी वर्दीतील या संवेदनशीलते’चे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी