Sonam Wangchuk Update: दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल असलेल्या सोनम वांगचुक यांना पत्नी गीतांजली यांनी खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी केली आहे. पत्नी गीतांजली आंगमो यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आंगमो म्हणतात की, त्यांचा आता सफदरजंग रुग्णालयावर विश्वास राहिलेला नाही. “ही एक बेकायदेशीर अटक झाली आहे,” असे त्या म्हणाल्या. दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी वांगचुक यांना जंतर मंतरवरून ताब्यात घेऊन सफदरजंग रुग्णालयात नेले. रुग्णालयातही वांगचुक यांचे उपोषण सुरूच आहे. आज (19 जुलै) त्यांच्या उपोषणाचा 22 वा दिवस आहे. त्यांनी सलाईन, ओआरएस किंवा इतर औषधे घेण्यास नकार दिला आहे.
काय म्हणाल्या गीतांजली आंगमो?
गीतांजली आंगमो यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, रुग्णालयाने आम्हाला सांगितले होते की, सोनम वांगचुक यांच्या शरीरातील पोटॅशियमची पातळी 2.9 पर्यंत खाली घसरली आहे, जी चिंताजनक आणि जीवघेणी आहे. मात्र, रुग्णालयाने त्यांच्या जाहीर आरोग्य पत्रकात (Health Bulletin) हा आकडा मुद्दाम लपवून ठेवला आणि फक्त “पोटॅशियमची पातळी कमी होत आहे” असा मोघम उल्लेख केला. तब्बल 10 तास आणि वारंवार विनंत्या केल्यानंतर, शेवटी रात्री 10:30 वाजता त्यांनी आम्हाला रक्ताचे नमुने घेण्याची परवानगी दिली. त्यानंतर एका खासगी आणि स्वतंत्र लॅबमध्ये केलेल्या तपासणीत हा आकडा 3.5 आला, जो पूर्णपणे सामान्य (Normal) श्रेणीत आहे.
खाजगी रुग्णालयात हलवायला नकार देत आहेत
आम्ही वारंवार विनंत्या करूनही रुग्णालय प्रशासन त्यांना डिस्चार्ज द्यायला किंवा आमच्या पसंतीनुसार खाजगी रुग्णालयात हलवायला नकार देत आहे. आमच्या मजल्यावर (फ्लोअरवर) सुमारे 30 पोलीस तैनात आहेत आणि पूर्ण रुग्णालयात 100 हून अधिक पोलीस आहेत, ज्यामुळे आमच्या फिरण्यावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. हे वैद्यकीय उपचार नाहीत, तर ही बेकायदेशीर अटक (Detention) आहे. जर सोनम यांना काहीही झाले, तर त्याला रुग्णालय प्रशासन आणि सरकार पूर्णपणे जबाबदार असेल.
कोणत्याही कुटुंबाला या व्यवस्थेशी लढा द्यावा लागू नये
त्यामुळे, सोनम यांची तब्येत आणखी बिघडण्यापूर्वी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची परवानगी मिळावी, यासाठी मी आजच उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली आहे आणि तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. आपल्या माणसाला कुठे वैद्यकीय उपचार द्यायचे, एवढ्या साध्या हक्कासाठी कोणत्याही कुटुंबाला या व्यवस्थेशी (System) लढा द्यावा लागू नये. दरम्यान, जंतर मंतरवर सीजेपीचे आंदोलन सुरूच आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके हेदेखील उपोषणावर आहेत. आंदोलकांनी 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे.
20 जुलै हा दुसरा स्वातंत्र्य लढा
सोनम वांगचुक यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले की, 20 जुलै हा दुसरा स्वातंत्र्य लढा आहे. पेपरफुटीसारख्या अन्यायातून मुक्ती आणि माझ्या बेकायदेशीर अटकेसारख्या भीतीतून मुक्ती. नीट पेपरफुटी प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्याची आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरन्यायाधीश आणि वांगचुक 28 जूनपासून उपोषणावर आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम