Randeep Huda 72 National Award: रणदीप हुड्डा हा बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. मात्र, आता त्याने दिग्दर्शन क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या बायोपिकने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं नसलं, तरी रणदीपच्या दिग्दर्शनाला मोठी दाद मिळाली. या चित्रपटासाठी त्यांना 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक (Best Debut Director) हा सन्मान जाहीर झाला आहे.
‘प्रत्येक टप्प्यावर आव्हानांचा सामना करावा लागला’
राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर रणदीप हुड्डा भावूक झाल्याचं दिसून आलं. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना ते म्हणाले, “स्वातंत्र्य वीर सावरकर’साठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे.” तो पुढे म्हणाला, “या चित्रपटाने माझ्याकडून मी नेहमी करतो त्यापेक्षा कितीतरी अधिक मेहनत करून घेतली. चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान प्रत्येक टप्प्यावर नवीन आव्हान समोर उभे राहिले. मात्र, संपूर्ण टीमच्या पाठिंब्यामुळे आम्ही सर्व अडचणींवर मात केली. अभिनेता, सहलेखक आणि पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून मी या चित्रपटासाठी माझे सर्वस्व पणाला लावले. वीर सावरकरांची कथा प्रामाणिकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी होती.”
महेश मांजरेकर यांनी सोडलेला ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’
हा चित्रपट भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात रणदीप हुड्डा यांच्यासोबत अभिनेत्री अंकिता लोखंडेने सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरुवातीला महेश मांजरेकर करणार होते. मात्र, काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी हा प्रोजेक्ट सोडला आणि त्यानंतर रणदीप हुड्डा यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली.
2024 ला प्रदर्शित झालेल्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या या चित्रपटाच्या दिग्दर्शनावरून अनेक वाद चर्चेत होते. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी हा सिनेमा मध्येच सोडल्याची चर्चा होती. चित्रपटाचं दिग्दर्शन न करण्याची कारणही त्यावेळी महेश मांजरेकर यांनी सांगितली होती. रणदीप हुड्डासोबत झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी हा प्रोजेक्ट सोडल्याचं म्हटलं होतं.
कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?
सुमारे 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 31 कोटी रुपयांची कमाई केली होती. जर तुम्ही अद्याप ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ पाहिला नसेल, तर हा चित्रपट ZEE5 आणि JioTV वर पाहता येईल.