Last Updated:
महाराष्ट्र पोलीस दलाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना सोलापूर शहरातून समोर आली आहे. इथं एका पोलीस अधिकाऱ्याने एका शेतकऱ्याला तब्बल २८ लाखांचा गंडा घातला आहे.
सोलापूर: महाराष्ट्र पोलीस दलाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना सोलापूर शहरातून समोर आली आहे. बाजारभावापेक्षा कमी दराने सोनं देण्याचं आमिष दाखवून एका शेतकऱ्याची तब्बल २८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार दुसरा कोणी नसून चक्क सोलापूरमधील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक (ASI) असल्याचे उघडकीस आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोलीस अधिकाऱ्यासह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
‘असा’ रचला होता फसवणुकीचा सापळा
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली येथील खानापूर गावचे रहिवासी अमर सुनील तुपे (वय ३०) यांच्या घरात लग्नकार्य होते. लग्नासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करायचं होतं. हीच संधी साधून सोलापूरमधील भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. बाजारभावापेक्षा प्रति तोळा ५ हजार रुपये कमी दराने सोनं देण्याचं आमिष त्यांनी अमर यांना दाखवलं. या आमिषाला बळी पडून अमर यांनी आरोपींना २८ लाख रुपये दिले. यापैकी ६ लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने, तर २२ लाख रुपये रोख देण्यात आले.
नेमकी फसवणूक कशी झाली?
जानेवारी ते एप्रिल २०२६ दरम्यान आरोपींनी अमर आणि त्यांच्या मित्राला सोने देण्यासाठी सोलापूर रेल्वे स्टेशन आणि विश्व हॉटेल परिसरात बोलावलं. तिथे आरोपींनी सोने देण्याचं नाटक तर केले, मात्र त्याच वेळी एका फिल्मी स्टाईलने पोलिसांची गाडी तिथे आली. सदर बाजार पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जेव्हा गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे यांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आलं.
ती पोलिसांची गाडी घेऊन जाणारा दुसरा तिसरा कोणी नसून सोलापूरच्या सलगर वस्ती पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला सहाय्यक फौजदार अतुल सिद्रामप्पा न्यामणे (वय ५५, रा. उत्तर कसबा) असल्याचं समोर आलं. त्याने घटनास्थळी येऊन इतर दोन आरोपींना पकडून नेण्याचं नाटक केलं. यामुळे फिर्यादी अमर यांचे पैसेही गेले आणि त्यांना सोनेही मिळालं नाही. नंतर हे तिघेही पैसे आणि सोने वाटून घेऊन फरार झाले.
पोलिसासह तीन आरोपी गजाआड
सोलापूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत या टोळीतील तिघांना अटक केली आहे. अतुल सिद्रामप्पा न्यामणे (वय ५५, सहाय्यक फौजदार), लखन रामचंद्र ठोंबरे (वय ३४, रा. विटा, सांगली) आणि हरी मोहन केकडे (वय ५०, रा. वैराग, बार्शी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
विशेष म्हणजे, मुख्य आरोपी लखन ठोंबरे आणि हरी केकडे यांच्यावर यापूर्वीच खून, दरोडा आणि खुनाचा प्रयत्न यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी फसवणुकीची रक्कम जप्त करण्यासाठी ५ दिवसांची कोठडी मागितली होती. दरम्यान, या टोळीत रितेश कांबळे, एक महिला, मास्क घातलेला तरुण आणि इतर काही साथीदारांचाही समावेश असल्याची माहिती आहे. पोलीस आता त्यांचा कसून शोध घेत आहेत.
Solapur,Maharashtra
