Last Updated:
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यामध्ये रोहित शर्माने खणखणीत शतक ठोकलं आहे.
लंडन : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यामध्ये रोहित शर्माने खणखणीत शतक ठोकलं आहे. 3 वनडे मॅचच्या या सीरिजच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित शर्मा अपयशी ठरला, त्यानंतर रोहित शर्मा लॉर्ड्सवरच्या तिसऱ्या वनडेनंतर निवृत्त होणार, अशी वृत्त समोर आली, पण बीसीसीआयने ही वृत्त फेटाळून लावली. एकीकडे निवृत्तीची चर्चा सुरू असतानाच रोहित शर्माने लॉर्ड्सवर धमाकेदार शतक करून टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधलं हे 34 वे शतक आहे, तसंच लॉर्ड्सवर वनडे शतक करणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय ठरला आहे.
रोहित शर्माच्या आधी लॉर्ड्सवर वनडे क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूचा सर्वाधिक स्कोअर सौरव गांगुलीच्या नावावर होता. गांगुलीने 2004 साली इंग्लंडविरुद्ध 90 रनची खेळी केली होती. रोहित शर्माने 39 वर्ष आणि 80 दिवसांचा असताना लॉर्ड्सवर वनडे शतक झळकावलं, याचसोबत तो लॉर्ड्सवर वनडे शतक ठोकणारा सगळ्यात वयस्कर खेळाडू ठरला आहे. याशिवाय भारताकडूनही सगळ्यात जास्त वयात शतक करण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर झाला आहे.
परदेशामध्ये सर्वाधिक शतके
परदेशातल्या एकाच देशात सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर झाला आहे. इंग्लंडमध्ये रोहितच्या नावावर 8 वनडे शतकं आहेत. सचिन आणि सईद अन्वरच्या नावावर युएईमध्ये 7-7 शतकं आहेत, तर एबी डिव्हिलियर्स आणि क्विंटन डिकॉकने भारतात 7-7 वनडे शतकं केली होती. दुसरीकडे इंग्लंडमध्ये सर्वाधिक वनडे शतकं करण्याचा विक्रम जो रूटच्या नावावर आहे. रूटने इंग्लंडमध्ये 10 शतकं केली आहेत. या यादीत रोहित शर्मा आणि मार्कस ट्रेस्कॉथिक 8-8 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
टीम इंडियाला 388 रनचं आव्हान
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर इंग्लंडने 50 ओव्हरमध्ये 387/3 एवढा स्कोअर केला. इंग्लंडकडून बेन डकेटने सर्वाधिक 141 रन केले, तर जेकब बेथलने 91 रनची खेळी केली. याशिवाय जो रूट 91 रनवर नाबाद राहिला. तर जॉस बटलरने 13 बॉलमध्ये नाबाद 41 रन केले. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाला 2 आणि प्रिन्स यादवला 1 विकेट मिळाली.
Mumbai,Maharashtra
Jul 19, 2026 10:20 PM IST
