मी FDA अधिकारी, दुकान मालक चळाचळा कापायला लागला, ६ लाख दिले, नंतर कळालं की… वसईतला धक्कादायक प्रकार | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

Vasai News: वसईतील एका स्वीट मालकाला बनावट एफडीए अधिकारी बनून सहा लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला १२ लाखांची मागणी करण्यात आली, मात्र सरतेशेवटी दुकानदाराकडून सहा लाख घेण्यात आले.

 एफडीए अधिकारी बनून सहा लाखांना गंडा घातला
एफडीए अधिकारी बनून सहा लाखांना गंडा घातला

वसई : ‘आम्ही अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी आहोत…’ अशी बोगस ओळख सांगून वसईतील एका नामांकित स्वीट मार्ट मालकाला तब्बल ६ लाख रुपयांना लुटल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. दुकान सील करण्याची आणि मीडियात बदनामी करण्याची धमकी देऊन दिलेल्या टोळीविरोधात वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या तोतया अधिकाऱ्यांनी यापूर्वी मुंबईतही अशाच प्रकारे दुकान मालकांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

…आणि स्वीट मार्ट मालकाचे धाबे दणाणले!

वसई येथील व्यावसायिक रोहित सुकडिया यांचे मिठाईचे दुकान (स्वीट मार्ट) आहे. २३ जून रोजी त्यांच्या दुकानात काही स्त्री-पुरुष आले. त्यांनी आपण ‘एफडीए’ (FDA) चे उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे सांगितले. दुकानाची तपासणी करण्याचे नाटक करत त्यांनी खाद्यपदार्थांमधील त्रुटी आणि काही मुदतबाह्य वस्तू शोधून काढल्याचा दावा केला.

तुमच्या दुकानात अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न आहे. आम्ही आताच्या आता दुकान सील करणार, तुमच्यावर गुन्हा दाखल करून थेट जेलमध्ये पाठवणार आणि मीडियाला बोलावून तुमची बदनामी करणार, अशी धमकी या तोतया अधिकाऱ्यांनी सुकडिया यांना दिली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे आणि बदनामीच्या भीतीने दुकान मालक पुरता घाबरला आणि चळाचळा कापायला लागला.

१२ लाखांची मागणी, ६ लाखांवर तडजोड

व्यापाऱ्याची घाबरलेली अवस्था पाहून आरोपींनी आपला डाव साधला. हे प्रकरण कोर्ट-कचेरीत गेले तर तुमचे दुकान कायमचे बंद होईल, त्यापेक्षा इथेच मॅटर क्लोज करा, असे सांगून त्यांनी थेट १२ लाख रुपयांची खंडणी मागितली. अनेक विनवण्या आणि वाटाघाटी झाल्यानंतर अखेर ६ लाख रुपयांवर तडजोड झाली. दुकान मालकाने कशीबशी ६ लाखांची रोकड गोळा करून या भामट्यांच्या हाती सोपवली. पैसे घेऊन आरोपी तिथून पसार झाले.

नंतर कळाले की ‘ते’ तर तोतया आहेत!

आरोपी गेल्यानंतर दुकान मालकाला संशय आला. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची अंतर्गत चौकशी केली असता, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. दुकानात आलेले लोक कोणतेही सरकारी अधिकारी नसून, ते केवळ खंडणी वसूल करणारे ‘तोतया’ अधिकारी होते, हे त्यांना समजले. स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुकडिया यांनी थेट माणिकपूर पोलीस ठाणे गाठले.

बोरिवलीतही केला होता असाच ‘गेम’

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात विजय जाधव, स्वाती तुळसकर, स्वाती राठोड आणि त्यांच्या इतर साथीदारांविरोधात फसवणूक, खंडणी आणि बनावट सरकारी अधिकारी बनल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टोळीतील मुख्य सूत्रधार विजय जाधव आणि स्वाती तुळसकर यांनी यापूर्वी मुंबईतील बोरिवली भागातही एका हॉटेल व्यावसायिकाला अशाच प्रकारे ‘FDA अधिकारी’ बनून लाखो रुपयांचा गंडा घातला होता. तिथेही त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *