Last Updated:
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विजय एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहेत, मात्र यावेळी एका छोट्या कारसोबत खेळताना दिसत आहेत.
चेन्नई: साऊथचे सुपरस्टार आणि तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री थलापती विजय यांनी राज्यात कामाचा धडाका लावला आहे. अनेक लोकोपयोगी कामे सुरू केल्याने नागरिकांमध्ये त्यांचं कौतुक होताना दिसत आहे. अशातच विजय यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विजय एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहेत, मात्र यावेळी एका छोट्या कारसोबत खेळताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांना त्यांचा हा अंदाज आवडला आहे.
मंत्रालयातील अत्यंत गंभीर बैठकीत बसलेले मुख्यमंत्री अचानक एका लहान मुलासारखे कारसोबत खेळताना दिसल्याने चाहत्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसेनासा झाला आहे. प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या एका नेत्याच्या मनातील एक लहान मूल व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर आले आहे. याला नेटकरी विजय यांचा आजवरचा सर्वात क्युट मोमेंट म्हणत आहेत.
खेळण्यातील कार अन् मुख्यमंत्र्यांची उत्सुकता
मुख्यमंत्री विजय यांनी तामिळनाडूतील EV गुंतवणुकीच्या संदर्भात आशिया खंडाचे मॅनेजिंग डायरेक्टर फाम सान चाऊ यांच्यासोबत चेन्नईच्या सचिवालयात एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. कोट्यवधींच्या करारावर चर्चा सुरू असतानाच, फाम सान चाऊ यांनी मुख्यमंत्री विजय यांना एका इलेक्ट्रिक कारचे खेळण्यातील मॉडेल भेट म्हणून दिले. ही छोटीशी कार हातात येताच, मुख्यमंत्री क्षणभरासाठी आजूबाजूचा माहौल पूर्णपणे विसरून गेले. त्यांनी अत्यंत कुतूहलाने त्या कारचे चारही दरवाजे उघडले, कारच्या आत डोकावले आणि अगदी बारकाईने तिची रचना पाहू लागले. त्यांची उत्सुकता पाहून चाहत्यांच्या चेहऱ्यावरही हसू उमटले आहे.
‘जन नायकन’चा धुमाकूळ कधी?
एकीकडे मुख्यमंत्री म्हणून विजय आपल्या अंदाजाने लोकांना भुरळ घालत असताना, दुसरीकडे त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. थलपथी विजय यांचा शेवटचा आणि बहुप्रतीक्षित चित्रपट ‘जन नायकन’ लवकरच भारतात प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. दिग्दर्शक एच. विनोथ यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ‘A’ प्रमाणपत्र दिले आहे. निर्मात्यांनी अद्याप भारतातील अधिकृत रिलीज डेट जाहीर केली नसली, तरी युनायटेड किंगडममधील वितरक ‘अहिंसा एंटरटेनमेंट’ने हा चित्रपट येत्या २४ जुलै रोजी तिथे रिलीज होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Mumbai,Maharashtra
खेळण्यातली कार पाहून खूश झाले CM विजय, भर मीटिंगमध्येच खेळण्यात झाले दंग! VIRAL VIDEO ने इंटरनेटवर लावली आग
