Last Updated:
Jana Nayagan leak case news: साऊथ सुपरस्टार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांचे चाहते त्यांची शेवटची फिल्म ‘जन नायकन’ रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच विजय यांना मोठा धक्का बसला आहे.
साऊथ सुपरस्टार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी मुख्यमंत्री पदाचा पदाभार सांभाळल्यापासून अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. मात्र, चाहते त्यांची शेवटची फिल्म ‘जन नायकन’ रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच विजय यांना मोठा धक्का बसला आहे. मद्रास हायकोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान एका अशा गोष्टीचा उलगडा झालाय, ज्याने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली आहे. हा चित्रपट अद्याप थिएटरमध्ये रिलीज झालेला नसतानाही, तब्बल १ कोटी २० लाख लोकांनी तो आधीच पाहिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘जन नायकन’ ही फिल्म इंटरनेटवर लीक झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. दरम्यान, या पायरसी प्रकरणात अडकलेल्या आरोपींचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला असून चेन्नई पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
‘जन नायकन’ची चोरी झाली तरी कशी?
सरकारी वकिलांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा मुख्य आरोपी एक फ्रीलान्स फिल्म एडिटर आहे. त्याने एका नामांकित एडिटिंग स्टुडिओमधून चित्रपटाच्या फाईल्स गुपचूप हार्ड ड्राइव्हमध्ये कॉपी केल्या. त्यानंतर त्याने या सर्व फाइल्स जोडून एक संपूर्ण चित्रपट तयार केला आणि तो गुगल ड्राईव्हवर अपलोड केला. तिथूनच हा सिनेमा पायरसी करणाऱ्या वेगवेगळ्या वेबसाईट्सवर वाऱ्यासारखा पसरला. या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन मद्रास हायकोर्टाने मुख्य आरोपी एस. रजनी आणि जयप्रकाश यांच्यासह इतर आरोपींचा जामीन फेटाळला आहे.
२१ पैकी दोन आरोपी अजूनही फरार
चेन्नई पोलिसांनी कोर्टाला सांगितले की, या प्रकरणात एकूण २१ आरोपी असून त्यापैकी दोन जण अद्याप फरार आहेत. पायरसीच्या या मोठ्या रॅकेटमध्ये पैशांचे कोणते मोठे व्यवहार झाले आहेत का, याचा शोध घेण्यासाठी या फरार आरोपींना पकडणे अत्यंत गरजेचे आहे. या टप्प्यावर जर आरोपींना जामीन मिळाला, तर ते पुराव्यांशी छेडछाड करू शकतात, अशी भीती तपास यंत्रणेने व्यक्त केली. ९ आणि १० एप्रिल २०२६ च्या रात्री हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला होता, ज्यानंतर निर्मात्यांनी तातडीने हायकोर्टात धाव घेतली होती.
जुलैमध्ये ‘जन नायकन’ रिलीज होण्याची शक्यता
एच. विनोद यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘जन नायकन’ हा थलपती विजयचा राजकारणात येण्यापूर्वीचा शेवटचा चित्रपट होता. जानेवारी महिन्यात पोंगलच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणार होता, पण एका तक्रारीमुळे सेन्सॉर बोर्डाने तो पुनर्विलोकन समितीकडे पाठवला. आता अशी बातमी येत आहे की, सेन्सॉर बोर्डाचा हा वाद लवकरच मिटणार असून मेकर्स हा सिनेमा याच महिन्यात, म्हणजेच जुलै २०२६ मध्ये रिलीज करण्याची तयारी करत आहेत. या चित्रपटात विजयसोबत बॉबी देओल, पूजा हेगडे आणि प्रकाश राज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Mumbai,Maharashtra
थलापती विजयला मोठा धक्का! रिलीजच्या आधीच 1.2 कोटी लोकांनी पाहिली फिल्म, हायकोर्टाचा मोठा निर्णय
