जैन समाजाने बांगड्या भरल्या नाहीत; मनसेच्या संदीप देशपांडेंवर निलेश चंद्र मुनींचा पलटवार, जैन बांधवांनाही आवाहन


मुंबई : शहरातील घाटकोपरच्या एका सोसायटीमधील जैन (Jain) कुटुंबीयांनी सोसायटीत कुणालाही न विचारता पांढरी पट्टी मारली होती. या पांढऱ्या पट्टीला सोयायटीमधील इतर सदस्यांनी विरोध दर्शवला. युट्यूबर आणि रिल्सस्टार प्रसाद वेदपाठकने (Prasad vedpathak) ह्या मुद्द्यावरुन प्रश्न उपस्थित केले, माध्यमांनीही हा मुद्दा उचलून धरला. त्यानंतर, येथील पांढऱ्या पट्टीवर रंगकाम करण्यात आलं असून स्वत: प्रसादनेही आता हा वाद माझ्याकडून संपल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, अद्यापही ह्या वादाला वेगळाच रंग मिळत असल्याचं दिसून येत आहे. कारण, मनसेनं या वादात उडी घेत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महापालिकेला थेट इशारा दिला आहे. आता, संदीप देशपांडेंच्या भूमिकेवर जैन धर्मगुरु निलेश चंद्र मुनी (Nileshchandra muni) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांवरुन मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून दादर पश्चिममधील डीएस बाबरेकर मार्गावर पांढरे पट्टे मारल्याने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आक्षेप घेतला आहे. बाबरेकर मार्गावरील जैन मंदिराच्या बाजूच्या लेनमध्ये हा पट्टा मारण्यात आला आहे. लेनच्या सुरुवातीपासून ते गोकुळ धामच्या इमारतीपर्यंत हा पट्टा मारण्यात आल्याने संदीप देशपांडे यांनी महापालिकेला इशारा दिला होता. त्यावरुन, आता जैन मुनी निलेश चंद्र यांनी जैन बांधवांना आवाहन केलं आहे. 

संदीप देशपांडे दोन समाजामध्ये दरी निर्माण करत आहेत, जैन समाज शांतता प्रिय आहे, याचा अर्थ जैन समाजाने बांगड्या भरल्या नाहीत. पण, जैन समाजाला मी आवाहन करतो की, तुम्ही शांतता राखा जास्त विरोध करू नका, असे जैन धर्मगुरु निलेश चंद्र मुनींनी म्हटलं आहे. संदीप देशपांडे बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे जात असतील तर, बाळासाहेब ठाकरे यांनी जैन, मारवाडी लोकांवर प्रेम केलं, त्यांनी कुठलाही त्रास दिला नाही, अशी आठवण निलेश चंद्र मुनींनी करुन दिली.  

नमाज पडताना पांढरे घालून बसतात – मुनी

संदीप देशपांडे तुम्हाला जर खरंच वाटत असेल तर तुम्ही मुंब्रा, भेंडी बाजार, पायधुनीला जा तिथे ज्याप्रकारे ईदच्या दिवशी किंवा नमाज पडताना रस्त्यावर पांढरे घालून बसतात त्याला विरोध करा, असे चॅलेंजच जैन मुनींनी संदीप देशपांडेंना दिलं आहे. मुंब्रामध्ये एमआयएमची नगरसेविका म्हणते मुंब्रा हरा कर दुंगी त्याला तुम्ही विरोध करा, तुम्ही दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू नका, असे निलेश चंद्र मुनी यांनी जैन समाज आणि सोसायटीमधील पांढऱ्या पट्टींवरुन सुरू असलेल्या वादावर आणि मनसेच्या भूमिकेवर आपली प्रतिक्रिया दिली.  

नेमका वाद काय?

युट्यूबर प्रसाद वेदपाठकच्या घाटकोपरमधील सोसायटीत काही जैन समाजातील लोकांनी पांढऱ्या रंगाची पट्टी मारल्याची माहिती समोर आली. त्यावर प्रसादने प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, आपल्या सोसायटीच्या आवारात अशी पांढरी पट्टी मारण्यात आली, त्यावेळी सोसायटीतील सदस्यांची परवानगी कुणीच घेतलेली नाही, असा दावा त्याने केला आहे. प्रसादच्या माहितीनुसार, जैन धर्मगुरूंसाठी ही पट्टी आखण्यात आली आहे. धार्मिक मान्यता पाळायच्या असतील तर त्या घरी कराव्यात सार्वजनिक ठिकाणी असं प्रकारच्या कृत्यावर प्रसादनं आक्षेप नोंदवला होता. तसेच, हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, त्यामळे ही पट्टी लवकरात लवकर हटवावी, अशी मागणीही त्याने केली होती. अखेर, वाढत्या विरोधानंतर पांढऱ्या पट्ट्यांवर रंगकाम करण्यात आले. त्यानंतर, हा वाद संपुष्टात आला. मात्र, आता मुंबईतील इतर ठिकाणीही अशा पांढऱ्या पट्ट्यांवरुन वाद होताना दिसून येत आहे. 

हेही वाचा

जैनांसोबत पंगा, जीवे मारण्याची धमकी; प्रसाद वेदपाठकची मनसेकडे मदतीसाठी धाव, अविनाश जाधवांचा शब्द, म्हणाले…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *