Last Updated:
Raigad News: आईने आपल्या चार निष्पाप मुलांना थंडपेयातून विष देऊन स्वतःही विषप्राशन केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
रायगड : रायगड जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडीवर आईने आपल्या चार निष्पाप मुलांना थंडपेयातून विष देऊन स्वतःही विषप्राशन केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत आईसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला असून दोन मुलांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात तीव्र हळहळ आणि शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, माणगाव जवळील खरवली आदिवासी वाडीवर राहणाऱ्या आशा जाधव (वय 29 वर्षे) या महिलाने हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी बाजारातून आणलेल्या थंडपेयामध्ये विषारी औषध मिसळले. हे विषारी थंडपेय त्यांनी स्वतः पिण्यापूर्वी आपल्या चार लहानग्या मुलांना प्यायला दिले. थंडपेय प्यायल्यानंतर काही वेळातच मुलांना आणि आईला उलट्यांचा त्रास होऊ लागला. हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
नेमकं काय घडलं?
रुग्णालयात उपचार सुरू असतानाच विषबाधेमुळे आई आणि दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. आशा जाधव ( 29 वर्षे – आई), नंदिनी जाधव (7 वर्षे – मुलगी), दुर्वा जाधव (6 वर्षे – मुलगी) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेत आशा जाधव यांची इतर दोन मुले सुदैवाने बचावली असली, तरी त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. सध्या त्यांच्यावर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टर या चिमुरड्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
टोकाचे पाऊल का उचलले?
एका आईने आपल्या पोटच्या चार निष्पाप मुलांना मृत्यूच्या दारात ढकलून स्वतःचे जीवन संपवण्यासारखे एवढे गंभीर पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घरगुती वाद, आर्थिक अडचण की इतर कोणते मानसिक नैराश्य यामागे होते, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात आणि घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून आशा जाधव यांच्या पतीने किंवा नातेवाईकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
Raigad,Maharashtra
रायगड हादरले! माणगावमध्ये आईने 4 मुलांना कोल्ड्रिंकमधून विष देऊन स्वतःलाही संपवले; मायलेकींसह तिघांचा मृत्यू
