Ind vs Afg 1st ODI Live Update : धर्मशाळेत वरुणराजाची ‘धो-धो’ बॅटिंग; ना नाणेफेक, ना खेळपट्टीचा अंदाज; रोहित शर्मासह दोन्ही संघांचे डोळे आकाशाकडे, जाणून घ्या Live अपडेट्स


India vs Afghanistan 1st ODI Rain plays spoilsport in Dharamshala : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव ऐतिहासिक कसोटी सामन्यानंतर आता दोन्ही संघ वन-डेच्या रणांगणात आमनेसामने येण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण, या हायहोल्टेज सामन्यावर सुरुवातीलाच संकटाचे ढग जमा झाले आहेत. हिमाचल प्रदेशच्या नयनरम्य धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमवर पहिला वन-डे सामना खेळवला जाणार आहे, मात्र सामना सुरू होण्यापूर्वीच पावसाने व्हिलनची भूमिका साकारत खेळात मोठा व्यत्यय आणला आहे. पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे ठरलेल्या वेळेत टॉस (नाणेफेक) देखील होऊ शकलेला नाही. मैदानावरील खेळपट्टी आणि आऊटफिल्ड पूर्णपणे झाकून ठेवण्यात आले असून, माजी कर्णधार रोहित शर्मासह दोन्ही संघांचे खेळाडू चिंतेने आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. आता सगळ्यांची नजर एकच गोष्टीवर आहे, पाऊस कधी थांबणार आणि खेळाडू मैदानात कधी उतरणार?

हिमाचलचे हवामान आणि ‘त्या’ पोस्टची चर्चा!

हिमाचल प्रदेशात पावसाची एन्ट्री कधी होईल, याचा नेमका अंदाज लावणे हवामान खात्यालाही कठीण जाते. धर्मशाळा तर आपल्या लहरी हवामानासाठीच ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल, म्हणजेच 12 जून रोजी धर्मशाळा आणि आसपासच्या परिसरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. खुद्द आयपीएल (IPL) चे चेअरमन अरुण धुमळ यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करून येथील भीषण पावसाची माहिती दिली होती. मैदानावर इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे की, त्याचा थेट परिणाम आजच्या खेळपट्टीवर आणि आऊटफिल्डच्या वेगावर होणार हे स्पष्ट दिसत आहे.

दुपारी 2 ते 4 दरम्यान धोक्याची घंटा; काय सांगतोय रिपोर्ट?

‘एक्यूवेदर’ (AccuWeather) च्या रिपोर्टनुसार, क्रिकेट चाहत्यांसाठी एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर येत आहे. आज सामन्याच्या दिवशी धर्मशाळात 80% पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुपारी 2 ते 4 वाजेदरम्यान पावसाचा जोर सर्वात जास्त असणार आहे. हाच काळ सामन्याच्या सुरुवातीचा असल्याने चाहत्यांच्या उत्साहावर विरजण पडू शकते. रात्री 8 च्या सुमारास पुन्हा एकदा हलक्या सरी किंवा रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ओव्हर्स कमी होणार की मॅच रद्द?

जर पावसाचा हाच थरार सुरू राहिला, तर डकवर्थ-लुईस (DLS) नियमानुसार सामन्याचे ओव्हर्स कमी केले जाऊ शकतात. चाहत्यांना 50 ओव्हर्सऐवजी 20 किंवा 25 ओव्हर्सचा मर्यादित सामना पाहायला मिळू शकतो. मात्र, जर पाऊस थांबलाच नाही आणि मैदान खेळण्यायोग्य राहिले नाही, तर मात्र पंच (Umpire) आणि मॅच रेफरी हा मुकाबला रद्द करण्याचा मोठा निर्णय घेऊ शकतात.

‘हिटमॅन’च्या एन्ट्रीसाठी चाहते बेताब!

या वन-डे मालिकेतून ‘हिटमॅन’ रोहित शर्मा पुन्हा एकदा भारतीय जर्सीमध्ये मैदानात उतरणार असल्याने चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रोहितच्या तुफानी फलंदाजीशिवाय, कर्णधार शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या कामगिरीवरही सर्वांच्या नजरा असतील. तसेच, आक्रमक गोलंदाज अर्शदीप सिंग अफगाण फलंदाजांना कसे रोखतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *