मी खरंच सांगतो… समाधान सगळ्यांचंच होणार नाही… कृषी मंत्र्यांचं मोठं विधान, कर्जमाफीवर काय काय म्हणाले? – Marathi News | Farmer loan waiver not all farmers will be satisfied says agriculture minister bharane while talking on rohit pawar protest


राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे, मात्र यात काही अटी आहेत, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही. या कर्जमाफीच्या विरोधात आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये साताबारा कोरा करण्यासाठी रोहित पवार आंदोलनाला बसले आहेत. शेतकरी कर्जमाफीत काही जाचक अटी सरकारने घातल्या आहेत. त्या मागे घेतल्याशिवाय आमचे अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे. या सर्व प्रकरणावर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

कृषिमंत्री भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीच्या निवेदनावर बोलताना म्हटले की, ‘शेतकऱ्यांचं म्हणणं होतं, जी आपण कर्जमाफी दिली आहे त्यामध्ये सुधारणा करा. आमच्या भावना दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर घाला. त्यांनी जे निवेदन दिले आहे ते मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. मला विश्वास आहे मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील.’

रोहित पवार यांच्या मागण्यांबाबत बैठक होणार

रोहित पवार यांच्या आंदोलनावर बोलताना मंत्री भरणे म्हणाले की, ‘काल रात्री रोहित पवारांशी दोन वेळा फोनवरून बोललो आणि मुख्यमंत्र्यांशी पण बोललो. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे की आपण त्यांची बैठक लावू. यामध्ये काय मार्ग काढता येईल रोहित दादांच्या काय मागण्या आहेत हे सगळं समजून घेऊ. मंगळवारी बैठक बोलावली आहे. मला विश्वास आहे मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. आम्ही आश्वासित करतो की शेतकऱ्यांचं हीत साधणारं सरकार आहे. रोहित दादांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर त्यांच्या मनातला गैरसमज दूर होईल.’

सर्व शेतकऱ्यांच समाधान होणार नाही – भरणे

पुढे बोलताना भरणे म्हणाले की, दोन अटी 100% आहेत, तिजोरीवर ताण असताना सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठा निर्णय घेतला आहे. रोहित दादांना एवढंच सांगतो मंगळवारी एकदा आपली बैठक होईल त्यातून नक्कीच सकारात्मक मार्ग निघेल. आता मंगळवारची बैठक होऊ द्या, त्यानंतर मुख्यमंत्री निर्णय घेतील. शेतकऱ्यांनाही आश्वासित करतो की, मी खरच सांगतो की समाधान सगळ्यांचंच होणार नाही पण खूप मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी केलेली आहे. चर्चा झाल्याशिवाय पर्याय निघणार नाही.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *