जन्मदिनीच घरी पोचलं प्रसिद्ध क्रिकेटरचं पार्थिव, खांदा देताना भावूक सहकाऱ्यांना अश्रू अनावर – Marathi News | Afghanistan Cricket Star Shapoor Zadran Passes Away at 38 After Illness Cricketers Mourns Star Fast Bowler’s Demise


शापूर जादरान याने दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

क्रिकेट विश्वातून आलेल्या दु:खद बातमीमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर जदरान याचं 7 जुलै रोजी दीर्घ आजाराशी झुंज देताना निधन झालं. वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे, त्याच्या 39 व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच त्याचा मृत्यू झाला. 8 जुलै रोजी त्याचा वाढदिवस असतो, मात्र त्याच दिवशी त्याचं पार्थिव काबूलमध्ये पोहोचलं. हा हृदयद्रावक क्षण पाहून कुटुंबीयांसह सहकारी क्रिकेटपटूही भावुक झाले. त्याच्या निधनामुळे क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली असून अनेकांनी शोक व्यक्त केला. .

भारतात घेतला अखेरचा श्वास

शापूर जदरान याच्यावर दिल्ली-एनसीआरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित गंभीर आजाराने तो ग्रस्त होता. गेल्या अनेक महिन्यांपासून तो उपचार घेत होता,मात्र मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली. उपचारादरम्यान 7 जुलै रोजी त्याची प्राणज्योत मालवली. शापूर याचा जन्म 8 जुलै 1987 साली अफगाणिस्तानातील लोगर प्रांतात झाला होता आणि यंदा तो 39 वाढदिवस साजरा करणार होता

अखेर काल त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच (8 जुलै)शापूरचं पार्थिव काबूल विमानतळावर आणण्यात आलं. यावेळी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अधिकारी, विद्यमान आणि माजी खेळाडू तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. राशिद खान, मोहम्मद नबी यांच्यासह अनेक सहकारी क्रिकेटपटूंच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते.. विशेषतः राशिद खान याला त्याच्या भावना आवरता आल्या नाहीत.

उंच बांधा, लांब केस आणि खूप वेगाने गोलंदाजी करणारा शापूर जदरान हा अफगाणिस्तान क्रिकेटच्या सुरुवातीच्या यशस्वी पिढीतील महत्त्वाचा खेळाडू होता. त्याने आपल्या कारकिर्दीत भारताचे गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांसारख्या दिग्गज फलंदाजांना बाद करत आपली वेगळी ओळख निर्माण केली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, काबूलमधील ऐतिहासिक ईदगाह मशिदीत त्याच्या जनाज्याची नमाज अदा करण्यात येणार असून, त्यानंतर मरंजन हिल येथील कब्रस्तानात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारल होतील.

शापूर याची काकीर्द

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत शापूर जदरान याने अफगाणिस्तानकडून 44 एकदिवसीय सामन्यांत 43 विकेट्स, तर 36 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 37 बळी घेतले. 2012-13 च्या बांग्लादेश प्रीमियर लीगमध्येही तो सहभागी झाला होता. अफगाणिस्तान क्रिकेटला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचं नाव कायम आदराने घेतल जाईल.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *