शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीवर उद्धव ठाकरे रुसले, अखेर पवारांच्या राष्ट्रवादीला करावा लागला खुलासा, महाराष्ट्राचं राजकारण तापलं – Marathi News | Shashikant Shinde clarification over Sharad pawar meet with shivsena leader Eknath shinde uddhav Thackeray upset Sanjay raut


महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते शरद पवार काल विधान भवनात आले होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीसाठी शरद पवार आले होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडीत शरद पवारांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाला आहे. शरद पवार एकनाथ शिंदे यांना भेटले, हे उद्धव ठाकरे गटाला अजिबात पटलेलं नाही. संजय राऊत यांनी आज आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. “शरद पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत. आमचं मन दुखावलं असं संजय राऊत यांनी म्हटलय. सरकार पाडलं त्यांच्यासोबत बैठकीने विश्वासहर्ता कमी होते” असं संजय राऊत म्हणाले. शिंदेच्या दालनातील बैठकीने ठाकरेंची शिवसेना दुखावली गेली आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पवार आणि शिंदेंच्या भेटीवर स्पष्टीकरण दिलं आहे. “या भेटीकडे राजकीय नजरेतून बघू नये. मविआ म्हणून आम्ही एकत्र आहोत. पवारसाहेबांची तब्येत पाहता बाजूला गाडी होती. दुसऱ्या माळ्यावर बैठक होती. हा निव्वळ योगायोग आहे. यात कुठलही राजकीय प्लानिंग, संदेश देणं असं काहीही नाहीय” असा खुलासा शशिकांत शिंदे यांनी केला. “पवारसाहेबांना हे माहितही नव्हतं. जयंत पाटील आम्ही सर्व आमदार साहेबांना बोललो की, इतक्या लांब जाण्यापेक्षा इथल्या इथे बसूया” असं शशिकांत शिंदे म्हणाले.

प्रत्येक गोष्टीत स्टेटमेंट देणं मला योग्य वाटत नाही

“मला वाटतं की या घटनेकडे प्रत्येकाचा पाहण्याचा आपला दृष्टीकोन आहे. संजय राऊत यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाबद्दल माहित आहे. प्रत्येक गोष्टीत स्टेटमेंट देणं मला योग्य वाटत नाही. काल सुद्धा आमच्या पक्षाचं स्टेटमेंट त्यांनीच दिलं. आपण एकत्र चाललो पाहिजे या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. संजय राऊत, उद्धव ठाकरेंनी गैरसमज निर्माण करुन घेऊ नये” असं शशिकांत शिंदे म्हणाले. “पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत, म्हणून सत्कार केला असेल. त्याचा वेगळा अर्थ काढू नये. त्या बैठकीला शिवसेनेचे कोणी आमदार-खासदार नव्हते. नाहीतर शिवसेनेशी चर्चा केली असा आरोप झाला असता” असं शशिकांत शिंदे म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *