चार दिवसांनी आईच्या कुशीत परतला एक वर्षाचा साहिल; ऐन दिवाळीत झालं होतं अपहरण, एकाला अटक! कशी फिरली तपासाची चक्र?


Sangli crime: सांगलीत चार दिवसांपूर्वी अपहृत झालेला एक वर्षाचा साहिल अखेर आईच्या कुशीत परतला. रत्नागिरीतून त्याला सुखरूप सोडवण्यात आले. पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद मानली जाते आहे.

child kidnapped in sangli rescued by the police
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सांगली, स्वप्निल एरंडोलीकर: सांगलीतील विश्रामबाग चौकातून अपहरण झालेला एक वर्षाचा साहिल तब्बल चार दिवसानंतर आईच्या कुशीत विसावला आहे. शहरातील पोलीस प्रशासनाचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतानाही पोलिसांच्या अथक प्रयत्नाला शुक्रवारी यश आले. आईच्या कुशीत विसावलेल्या साहिलला पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी मिठाई चारून आनंद व्यक्त केला. तर बागरी दाम्पत्याच्या चेहऱ्यावरील आनंद पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना दिसत होता.

साहिल याला रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथून शोधून काढण्यात आले. याप्रकरणी मिरजेतील एकाला अटक करण्यात आली असून या अपहरणाचे मुख्य सूत्रधार असलेले दाम्पत्य फरार झाले आहे. त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी दिली. इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज (वय ४३, रा. किल्ला भाग, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर इम्तियाज पठाण आणि वसीमा इम्तियाज पठाण हे पसार झाले आहेत.
Maharashtra Timesबिहारमध्ये चर्चेत एकनाथ शिंदे, कोणाचे वांदे? शहांनी दिलेले ‘नागरिकशास्त्राचे धडे’ गोत्यात आणणार?

नेमकं काय घडलेलं?

सोमवार दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री दहानंतर विश्रामबाग चौकातून अज्ञातांनी साहिल (वय १ वर्ष) याचे अपहरण केले होते. पहाटेपर्यंत साहिल न सापडल्याने त्याच्या पालकांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव गुन्हे प्रकटीकरण शाखेसह पोलिसांना साहिलचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. तर एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे सुटीवर असतानाही त्यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्यासह पथक तयार करून साहिलच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके पाठवली.शहरातील प्रशासनाचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने साहिलचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. तर दुसरीकडे लक्ष्मीपूजन असल्याने व्यापाऱ्यांनीही तातडीने मदत करण्यास नकार दिला होता. तरीही पोलिसांनी त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवले. शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज शोधूनही साहिलचे अपहरण करणाऱ्यांचा मागमूस मिळत नव्हता. एलसीबीकडील संदीप नलवडे, आमिरशा फकीर यांना इनायत गोलंदाज तसेच पठाण दाम्पत्याने साहिलचे अपहरण केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. एलसीबीच्या पथकाने तातडीने मिरजेतून इनायत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने पठाण दाम्पत्याने साहिलचे अपहरण केल्याची कबुली दिली. तसेच इनायतने स्वतः रत्नागिरी जिल्ह्यातील राजेशिर्के यांना मूलबाळ नसल्याने त्यांच्याकडे साहिलला दिल्याचीही कबुली दिली.
पथकाने तातडीने सावर्डे येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने साहिलला ताब्यात घेतले. तसेच इनायतला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी पठाण दाम्पत्याचा युद्धपातळीवर शोध सुरू केला आहे. तब्बल चार दिवसानंतर साहिल आईच्या कुशीत विसावल्यानंतर पोलीस पथकाने सुटकेचा निःश्वास सोडला. ऐन दिवाळीचा सण सोडून एलसीबी आणि विश्रामबागचे पथक साहिलच्या शोधात फिरत होते. साहिल सापडल्यानंतर पोलिसांच्या चेहऱ्यावरील आनंदही बरेच काही सांगून जात होता.

हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!

पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अपर अधिक्षक कल्पना बारवकर, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, सपना गराडे, संदीप नलवडे, आमिरशा फकीर, सागर लवटे, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, उदयसिंह माळी, महादेव नागणे, सुनिता शेजाळे, विक्रम खोत, विनायक सुतार, सुशील मस्के, सोमनाथ पतंगे, विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील बिरोबा नरळे, प्रशांत माळी, महम्मद मुलाणी, आर्यन देशिंगकर, योगेश पाटील, सायबर पोलिस ठाण्याकडील अभिजित पाटील, अजय पाटील, रत्नागिरीच्या सावर्डे पोलिस ठाण्याकडील गंगनेष पट्टेकर, उमेश कांबळे, साधना ओमासे यांनी या कारवाईत भाग घेतला.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा