FIFA: ‘आम्हाला काहीच आयतं मिळालेलं नाही’, अर्जेंटीनाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरून मेस्सीचा संतापImage Credit source: fifa world cup twitter
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अर्जेंटीनाने जबरदस्त कामगिरी केली आहे. अर्जेंटीनाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. साखळी फेरीत अल्जेरियाला 3-0, ऑस्ट्रियाला 2-0 आणि जॉर्डनला 3-1 ने मात दिली. त्यानंतर राउंड ऑफ 32 मध्ये केप वर्डेवर 3-2 असा थरारक विजय मिळवला. राउंड ऑफ 16 मध्ये इजिप्तचा 3-2 ने धुव्वा उडवला. तर उपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडवर 3-1 अशी मात मिळवली. उपांत्य फेरीत इंग्लंडला 2-1 ने पराभवाची धूळ चारली. आता अंतिम फेरीत अर्जेंटीनाचा सामना स्पेनशी होणार आहे. पण अर्जेंटीनाच्या या प्रवासावर अनेकांनी टीका केली आहे. साखळी फेरीत अर्जेंटीनासमोर सोपे संघ होते. बाद फेरीतही अर्जेंटीनासमोर दुबळे संघ खेळले. तसेच सामन्यातील काही निर्णय अर्जेंटीनाच्या बाजूने दिल्याने वादाला फोडणी मिळाली आहे. असं असताना अर्जेंटीना संघाचा कर्णधार लियोनल मेस्सीने टीकाकारांना उत्तर दिलं आहे. आम्हाला सगळं काही आयतं मिळाली नाही, अशा शब्दात सुनावलं आहे.
काय म्हणाला लियोनल मेस्सी?
अर्जेंटीनाचा लियोनल मेस्सीने सांगितलं की, ‘आम्ही पुन्हा एकदा जगातील टॉपला असलेल्या दोन संघात स्थान मिळवलं आहे. आम्ही जे काही केलं ते काही असंच मिळालं नसल्याचं स्पष्ट दिसतं. आम्हाला ताटात काही वाढवून दिलं नव्हतं. सलग दोन वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणं खूपच कमी संघांना शक्य झालं आहे. आम्ही ते करून दाखवलं आहे. जर आम्हाला इंग्लंडने पराभूत केलं असतं, तर लोकं काही वेगळंच बोलत असते. पण आम्ही त्यांना तशी संधी दिली नाही.’
अंतिम सामन्यात स्पेनशी लढत होणार आहे. या सामन्याबाबत मेस्सी म्हणाला की, स्पेन हा उत्कृष्ट संघ असून त्यांनी या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यांची खेळण्याची पद्धत वेगळी आहे. मी त्यांच्या अनेक खेळाडूंना चांगल्या प्रकारे ओळखतो.
अर्जेंटीना स्पेन अंतिम सामना
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीत आता अर्जेंटीना आणि स्पेन हे दोन संघ आहेत. भारतीय वेळेनुसार हा सामना सोमवारी 20 जुलैला मध्यरात्री 12.30 वाजता खेळला जाणार आहे. लियोनल मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप आहे. जर अर्जेंटीनाने हा वर्ल्डकप जिंकला तर 1962 नंतर ब्राझीलनंतर सलग दोनदा वर्ल्डकप जिंकणारा दुसरा संघ ठरेल. तर स्पेनने 2010 मध्ये जेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे तब्बल 16 वर्षांनी जेतेपदाची संधी चालून आली आहे. विशेष म्हणजे स्पेन आणि अर्जेंटीना संघातील तब्बल 10 खेळाडू हे एटलेटिको माद्रीद या एकाच क्लबकडून खेळतात.