Yo Yo Honey On Bad Phase Of Life : हनी सिंहने 2010 नंतरचा काळ खूप गाजवला, तरुणाई सतत त्याच्या गाण्यावर थिरकायची पण नंतर अचानक तो गायब झाला. या 7 वर्षांच्या कालावधीत त्याच्या आयुष्यात काय घडले हे त्याने सांगितले.

गायकाने उघड केले आहे की, त्याचे डोक्यावरील सर्व केस गळाले असून त्याला टक्कल पडले आहे आणि तो विग वापरतो. एका पॉडकास्टमध्ये हनी सिंगने सांगितले की, अमली पदार्थांचे व्यसन आणि ‘बायपोलर डिसऑर्डर‘शी सुरू असलेल्या उपचारादरम्यान त्याच्या डोक्यावरील सर्व केस गळाले होते.
‘हनी सिंग’ ने नुकतीच एक मुलाखत दिली तिथे तो म्हणाला की, कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आपली मानसिक स्थिती कशी खालावली, आणि त्यानंतर अनेक वर्षे एकांतवासात व उपचारांखाली घालवाली लागली, अखेर त्याला बरे होण्याचा मार्ग कसा सापडला. त्याने घेतलेल्या औषधांचे परिणाम आणि दुष्परिणाम यांवरही त्याने बऱ्याच गोष्टी सांगितल्या.
‘मला असे वाटत होते की जणू काही मी स्वर्ग आणि नरक यांच्या मधोमध अडकलेला.’
‘लुंगी डान्स’ आणि ‘ब्राउन मुंडे’ यांसारखी गाणी गाणाऱ्या हनी सिंहने सांगितले, ‘2018 आणि 2019 या संपूर्ण काळात, मला खात्री पटलेली मी आता मेलो आहे. मला वाटायचं की माझा मृत्यू झाला असून मी स्वर्ग व नरक यांच्या मधल्याच कुठल्यातरी जागेत अडकून पडलो आहे. जेव्हा जेव्हा माझी आई मला जेवण वाढायची, तेव्हा मी मनातल्या मनात विचार करायचो की हे माझे अगदी शेवटचे जेवण असेल. गेल्या सात वर्षांपासून मी तीच औषध घेत होतो, तरीही माझ्या प्रकृतीत सुधारणेची कोणतीच चिन्हे दिसत नव्हती. मात्र, जेव्हा अखेर मी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मी माझा डॉक्टरही बदलला. त्यांनी माझ्या काही औषधांमध्ये बदल केले, काही नवीन औषधे सुरू केली त्यानंतर अवघ्या चार आठवड्यांतच, माझी प्रकृती सुधारू लागली. मी पुन्हा लोकांची भेट घेणे आणि आयुष्याला नव्याने सामोरे जाणे सुरू केले.’
“माझे वजन १०५ किलोवर पोहोचले होते, माझे सर्व केस गळून पडले”
हनी सिंगने पुढे उघड केले की, या औषधांचा त्याच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला होता. “मी सलग सात वर्षे अत्यंत हाय डोस औषध घेत होतो. त्यामुळे माझे वजन प्रचंड वाढून 105 किलोवर पोहोचले आणि माझे सर्व केस गळून पडले. हे केस कृत्रिम आहेत. मी पूर्णपणे टकला आहे. हा एक विग आहे.” गायकाने हे देखील कबूल केले की, 2014 मध्ये अंमली पदार्थांचे सेवन थांबवल्यानंतरही, पूर्णपणे बरे होण्याची त्याची वाटचाल अत्यंत दीर्घ आणि खडतर होती.
जेव्हा तो भ्रम पहिल्यांदा बळावला
या गायकाने एबी टॉक्स या पॉडकास्टमध्येही सांगितले, “मी मुंबईत एका संगीत रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होतो आणि त्याच वेळी शाहरुख खानसोबत अमेरिकेच्या दौऱ्यावर होतो. त्यावेळी मला काही भ्रम पडू लागले- ‘मी आता मरणार आहे.’ त्यावेळी मी शिकागोमध्ये होतो. माझ्यासोबत कोणीतरी होते आणि त्यांनी मला सांगितले की, ‘तुला तालमीसाठी जायचे आहे.’ मी त्यांना उत्तर दिले की, ‘मी तिथे जाऊ शकत नाही.’ शाहरुख भाईंनी मला फोन केला आणि विचारले की, ‘काय झाले?’ मी त्यांना म्हणालो, ‘मी ठीक होईन; मी तुम्हाला थेट स्टेजवरच भेटेन.’ त्या क्षणी, मी अत्यंत घाबरलो होतो. मला वाटत होते की, मी तिथेच स्टेजवर मरणार आहे; आणि हे संकट कसे टाळावे, याचा मी आटोकाट प्रयत्न करत होतो. स्टेजवर जावे लागू नये किंवा माझा शो कॅन्सल व्हावा म्हणून, मी माझ्या डोक्याचे अर्धे केस काढून टाकले मात्र, त्यावर ते लोक मला सहजपणे म्हणाले, ‘आम्ही तुझ्या डोक्यावर फक्त एक टोपी घालून देऊ.’ मला असे वाटत होते की, माझ्या आजूबाजूचे लोक मी नेमक्या कोणत्या मानसिक अवस्थेतून जात आहे, हे समजूनच घेऊ शकत नव्हते.”
‘मी ७ वर्षे माझ्या घराच्या आतच राहिलो’
हनी सिंग म्हणाला, “माझ्या आतमध्ये एक प्रकारची घालमेल सुरू होती. मी ती व्यक्त करण्याचा प्रयत्न करत होतो, पण मला हतबल वाटत होते. मग, मी माझ्या बहिणीला फोन केला आणि तिला सांगितले की, माझ्यासोबत काहीतरी विचित्र घडत आहे. तिने मला सांगितले की, मी पुढे जाऊन तो शो परफॉर्म केलाच पाहिजे. केवळ दोन गाणी गायल्यानंतर, मी परफॉर्मन्स सोडून अगदी मध्यातूनच निघून गेलो. त्यानंतर, मी सलग सात वर्षे माझ्या घराच्या चार भिंतींच्या आतच बंदिस्त राहिलो.”
Pawan Choure Interview : ओंकार राऊत ऐवजी बिग बॉसमध्ये मी गेलो असतो तर राडा केला असता | पवन चौरे
आंघोळ करतानाही तो बाथरूमचा दरवाजा उघडाच ठेवायचो
त्याने पुढे सांगितले, “माझ्या चाहत्यांनी मला त्या अवस्थेत पाहावे, असे मला वाटत नव्हते. मी स्वतःला माझ्या घराच्या आतच कोंडून घेतले. अगदी माझ्या बालपणीच्या मित्रांनाही भेटलो नाही. कोणाशीही माझा काहीच संपर्क नव्हता. ना फोन कॉल्स, ना टीव्ही, ना इंटरनेट. जवळपास तीन वर्षे, ‘बायपोलर डिसऑर्डर’मुळे निर्माण होणाऱ्या भीतीशी आणि नकारात्मक विचारांशी मी झगडत होतो. तीन वर्षे मी माझ्या बेडरूमच्या बाहेर पाऊलही टाकले नाही. आंघोळ करतानाही मी बाथरूमचा दरवाजा उघडाच ठेवत असे.”
