The Ring Star Daveigh Chase Dies: फिल्म इंडस्ट्रीत (Film Industry) अनेक असे सेलिब्रिटी (Celebrity) आहेत, ज्यांनी पहिल्याच प्रोजेक्टमध्ये दमदार अभिनय सादर करुन धुमाकूळ घातला आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. पण, नंतर नियतीच्या फेऱ्यात अडकले आणि अचानक गायब झाले. आज आम्ही अशाच एका सुपरस्टार अभिनेत्रीच्या (Superstar Actress) संघर्षाची कहाणी सांगणार आहोत. जिनं फार कमी वयातच सिनेसृष्टीत पदार्पण केलं अन् थेट सुपरस्टार झाली, पण नंतर वैयक्तिक संघर्षांमुळे तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. ती सुपरस्टार अभिनेत्री म्हणजे, हॉलिवूड स्टार डेव्ही चेस (Daveigh Chase). जिनं ‘द रिंग’ (The Ring) आणि ‘लिलो अँड स्टिच’ (Lilo & Stitch) मधील भूमिकांमुळे जागतिक स्तरावर ओळख निर्माण केलेली. कधीकाळी रुपेरी पडद्यावर गाजलेली डेव्ही बऱ्याच काळापासून प्रसिद्धीच्या झोतातून दूर होती. ती आपल्या कुटुंबापासून दुरावली, तिनं अभिनय सोडला आणि अखेरीस ती बेघर झाली. 16 जून रोजी तिचं निधन झालं. आता तिच्या मृत्यूचं कारण समोर आलं असून, त्यामुळे तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय.
सुपरस्टार अभिनेत्रीच्या मृत्यूचं कारण नेमकं काय? (Superstar Actress Death Reason)
डेव्ही चेस हिचं 16 जून 2026 रोजी निधन झालं, पण त्यावेळी तिच्या मृत्यूचं कारण जाहीर करण्यात आलं नव्हतं. लॉस एंजेलिसच्या कोरोनर कार्यालयानं आता अभिनेत्रीच्या मृत्यूच्या कारणाला दुजोरा दिलाय. तिच्या मृत्यूचं मुख्य कारण ‘एड्स’ (AIDS) होतं. ती बॅक्टेरियल मेनिंजायटिस, सेप्टिक शॉक आणि शरीरात पसरलेल्या तीव्र संसर्गाशीही झुंज देत होती. दीर्घकाळापासून सुरू असलेला अंमली पदार्थांचा अतिवापर हे देखील तिच्या ढासळत्या आरोग्यामागील एक कारण मानलं जातंय.
हॉलिवूड स्टारपासून अगदी रस्त्यावर येण्यापर्यंतचा संघर्ष (Hollywood Star Daveigh Chase Struggle Life)
डेव्ही चेस हिनं अगदी लहान वयातच अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली होती. ‘द रिंग’ (The Ring) मधील ‘समारा मॉर्गन’ची अंगावर काटा आणणारी भूमिका आणि ‘लिलो अँड स्टिच’ (Lilo & Stitch) या सीरिजमधील व्हॉइस आर्टिस्ट म्हणून तिनं केलेलं काम आजही लोकांच्या लक्षात आहे. याव्यतिरिक्त, तिनं डॉनी डार्को (Donnie Darko), एस. डार्को (S. Darko) आणि विविध टीव्ही कार्यक्रमांमध्येही काम केलंय. मात्र, 2016 नंतर ती अचानक लोकांच्या नजरेतून गायब झाली.
तिच्या मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, एका सिनेमाच्या बैठकीला उपस्थित न राहिल्यानंतर तिनं आपला व्यवस्थापक आणि कुटुंब या दोघांशीही संपर्क तोडला. त्यानंतरच्या काळात, चोरीचं वाहन, अंमली पदार्थ बाळगणं आणि इतर कायदेशीर समस्यांशी संबंधित घटनांमध्ये तिचं नाव समोर आलंय. तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, ती बराच काळ बेघर होती आणि तिला अंमली पदार्थांच्या व्यसनाचा सामना करावा लागला.
बॉयफ्रेंडचा इमोशनल मेसेज आणि अकाली निधन (Actress Daveigh Chase Death)
डेव्हच्या निधनापूर्वी, तिचा बॉयफ्रेंड रॉय हर्नांडेझनं तिच्या वैद्यकीय खर्चासाठी ‘क्राउडफंडिंग’ मोहीम सुरू केली होती. त्यानं लिहिलं होतं की, डेव्हचं बालपण अत्यंत कष्टाचं होतं, ती तिच्या कुटुंबापासून दुरावली होती आणि सुरक्षित आयुष्याच्या शोधात तिला सतत संघर्ष करावा लागलेला. तिला खरोखरंच ज्या प्रेमाची आणि शांततेची गरज होती, ते तिला देण्याचं वचन आपण दिलं होतं, असं रॉयनं सांगितलेलं.
डेव्ह चेसची ही कहाणी केवळ एका यशस्वी अभिनेत्रीचं प्रसिद्धीच्या झोतातून अचानक नाहीसं होण्याबद्दल नाही, तर ती हे देखील अधोरेखित करतं की, प्रसिद्धी म्हणजे नेहमीच सुखी आयुष्याची हमी नसतं. पडद्यावर लाखो लोकांची मनं जिंकणाऱ्या या कलाकारानं, अखेरीस आजारपण, एकाकीपण आणि वैयक्तिक संघर्षांशी लढा देत जगाचा निरोप घेतला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा