Thane District Bank Election : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या राजकारणाचे वेगळे चित्र पाहायला मिळाले. राज्य आणि केंद्रात एकत्र सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार वेगवेगळ्या पॅनलमधून एकमेकांविरोधात रिंगणात उतरले होते. अखेर ‘परिवर्तन पॅनल’चा पराभव करत ‘सहकार पॅनल’ने या निवडणुकीत बाजी मारली.
गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहे. हे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी या निवडणुकीत वेगळी राजकीय रणनीती आखल्याची चर्चा आहे.
दोन्ही पॅनलमध्ये भाजप-शिंदे गटाचे उमेदवार
या निवडणुकीत ‘सहकार पॅनल’मधून शिंदे गटाच्या उमेदवारांसह आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे उमेदवार मैदानात होते. तर दुसरीकडे ‘परिवर्तन पॅनल’मध्येही भाजपचे चार आणि शिंदे गटाचे तीन उमेदवार निवडणूक लढवत होते.
दोन्ही पॅनलमध्ये आपल्या पक्षाचे उमेदवार देण्यामागे कार्यकर्ते आणि इच्छुकांची संख्या अधिक असल्याचे कारण संबंधित नेत्यांकडून देण्यात आले होते.
महायुतीच्या 13 उमेदवारांचा विजय
21 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत बहुमतासाठी 11 जागांची आवश्यकता होती. निकालानुसार भाजपचे 8 आणि शिंदे गटाचे 5 असे एकूण 13 उमेदवार विजयी झाले. त्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून, एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, या निकालामुळे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे.
सत्तेचा निर्णय वरिष्ठ नेत्यांकडे
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याकडे लक्ष लागले आहे. याबाबतचा अंतिम निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महायुती बँकेवरील सत्ता स्वतःकडे ठेवणार की बहुजन विकास आघाडीसोबत काही वेगळी भूमिका घेणार, याबाबतच्या निर्णयाकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
ही बातमी वाचा:
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं ‘हित’, ठाकरे ‘चिंतक’ | Special Report