Pune Bangalore Highway : सावधान! पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोल भगदाड, दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या कामाचा बट्ट्याबोळ, महामार्ग प्राधिकरणाचा निकृष्ट कारभार उघड


Satara Highway Damaged : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. सातारा शहराजवळील नागठाणे गावच्या हद्दीत मुख्य राष्ट्रीय महामार्गावर अचानक एक मोठं आणि खोल भगदाड पडल्याची भीषण घटना घडली आहे. सुदैवाने, महामार्गावरून प्रवास करणाऱ्या काही जागरूक प्रवाशांच्या हे निदर्शनास आलं. प्रवाशांनी दाखवलेल्या या सतर्कतेमुळे महामार्गावरील एक अत्यंत मोठा आणि भीषण अपघात टळला आहे.

या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली असून वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महामार्गावर एवढे मोठे भगदाड पडल्याचं समजताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी बॅरिकेड्स लावले असून, ती पूर्ण मार्गिका (Lane) तात्काळ वाहतुकीसाठी बंद केली आहे.

National Highway Authority : महामार्ग प्राधिकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि रस्ते बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराचा अत्यंत ढिसाळ व निकृष्ट दर्जाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे, ज्या रस्त्याला हे मोठे भगदाड पडले आहे, त्या रस्त्याचे काम अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच पूर्ण करण्यात आले होते. 

अवघ्या दोन महिन्यांतच कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला राष्ट्रीय महामार्ग खचल्यामुळे नागरिकांमधून आणि वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. इतक्या मोठ्या प्रकल्पात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

Satara Nagthane Traffic Update : वाहतुकीवर परिणाम, संथ गतीने प्रवास

पुणे-बेंगलोर महामार्ग हा अत्यंत वर्दळीचा आणि दक्षिण भारताला जोडणारा मुख्य महामार्ग मानला जातो. या महामार्गावरील नागठाणे येथील एक मार्गिका सुरक्षेच्या कारणास्तव पूर्णपणे बंद करण्यात आल्यामुळे या भागातील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. 

रस्त्याला भगदाड पडल्यामुळे महामार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहनचालकांना संथ गतीने प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाकडून हे भगदाड तातडीने बुजवून रस्ता पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.

Pune Bangalore Highways Potholes Danger : प्रवाशांना काळजी घेण्याचे आवाहन

दोन महिन्यांतच रस्ता खचल्यामुळे या महामार्गाच्या एकूणच सुरक्षिततेचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा घटनांमुळे कोणाचा नाहक बळी जाऊ नये, यासाठी संपूर्ण महामार्गाचे ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी सातारा जिल्ह्यातील नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांना नागठाणे गावच्या हद्दीत गाडी चालवताना विशेष काळजी घेण्याचे आणि वेग मर्यादित ठेवण्याचे आवाहन केले आहे.

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *