मुंबई : एकीकडे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे अजित पवारांच्या (Ajit pawar) राष्ट्रवादीत देखील सर्वकाही आलबेल असल्याचं दिसून येत नाही. यापूर्वी, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल पटेल यांचे नाव चर्चेत आल्यानंतर, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून त्यास विरोध झाला होता. त्यानंतर, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडेच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण सभेत प्रफुल पटेल यांच्याकडूनच ही घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता या निवडीला आक्षेप घेत सुनेत्रा पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर 2023 मध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. मात्र, 28 जानेवारी रोजी विमान अपघातात अजित पवारांचे निधन झाले, त्यानंतर, राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवारच (Sunetra Pawar) राष्ट्रीय अध्यक्ष असल्याची घोषणा केली. पटेल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत याबाबतचा प्रस्ताव मांडला, त्यास सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली. त्यामुळे, सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, आता याच निवडीला राष्ट्रवादी पक्षातूनच आक्षेप घेण्यात आला आहे.
सच्चिदानंद सिंह यांच्याकडून नोटीस
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्ष पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जेष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पक्षाच्या अध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांना 9 जुलै रोजी त्यांनी ही नोटीस बजावली असून राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रपुल्ल पटेल आणि पक्षाचे सचिव म्हणून ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात, 26 फेब्रुवारी 26 रोजी घेण्यात आलेली पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक ही अवैध असल्याचे म्हणत ती रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत स्वतंत्र आणि नि:पक्षपाती असा निवडणूक अधिकारी नेमून त्यांच्या मार्फत निवडणूक घेण्यात यावी. तोपर्यत राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुधारीत ॲाफिस बेअररची यादी देखील रद्द समजावी, असेही नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे.
हेही वाचा
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से