Sairat Fame Actor Arbaaz Sheikh Tukaram Munde Action: FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, ‘माझ्यासाठी विषय संपला’


सोलापूर : मराठी सिनेमात विक्रम रचलेल्या सैराट (Sairat) चित्रपटातील कलाकार अरबाज शेखच्या वडिलांना मेंदूचा आजार झाल्याने त्यांना सोलापूरच्या नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, येथील मेडिकलमधून औषधं (Medical) खरेदीसाठी सक्ती करण्यात येत असल्याचं अरबाजने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं. त्यानंतर, एफडीएने कारवाई करत नोबेल हॉस्पिटलमधील संबंधित मेडिकल दुकानाची तपासणी केली असून गंभीर त्रुटी आढळल्याने मेडिकल दुकानावर कारवाई केली आहे. त्यानंतर, आता अरबाज शेखने (Arbaj shaikh) व्हॉट्सअप स्टेटसद्वारे हा विषय माझ्यासाठी आता संपला असून आपल्या सर्वांचे आभार म्हटले आहे.

मी सोलापूरच्या एका हॉस्पिटलमधील अनियमिततेसंदर्भात मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर, मला असंख्य फोन्स आणि मेसेजेस येत असल्यामुळे मी तो व्हिडीओ डिलीट केला. सध्या माझ्या वडिलांची प्रकृती माझ्यासाठी प्राथमिकता आहे. याशिवाय प्रशासनाने दखल घेत संबंधित हॉस्पिटलच्या मेडिकलवर कारवाई केली आहे, अशी माहिती अरबाजने दिली. तसेच, आधी सांगितल्याप्रमाणे माझे वडील आणि कुटुंब याकडे लक्ष देणे मला जास्त गरजेचे वाटते. त्यामुळे माझ्यासाठी हा विषय इथेच संपलेला आहे. माझ्या कठीण काळात माझ्यासोबत उभे राहणाऱ्या सर्वांचे आभार, असे स्टेटस सल्ल्या म्हणजेच अरबाजने ठेवले असून हा विषय माझ्यासाठी संपल्याचं म्हटलं. 

मेडिकल दुकान बंद

सैराट फेम अभिनेता अरबाज शेख याच्या तक्रारीनंतर अन्न आणि औषध प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून अन्न आणि औषध प्रशासनाच्या आदेशानुसार अखेर सोलापुरातल्या नोबल हॉस्पिटलचे मेडिकल बंद करण्यात आले आहे. नोबल हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या फातिमा फार्मामध्ये तपासणी दरम्यान गंभीर त्रुटी आढळून आल्या असून रुग्णांना हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या मेडिकलमधूनच औषध घ्यायला सांगितलं जातं होते, त्यावरुन हा प्रकार उघडकीसा आला. आता अन्न व औषध प्रशासन विभागास हे आढळून आल्याने तातडीने दुकानातून औषध विक्री बंद करण्यात आली आहे. दरम्यान, अरबाजने व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर असंख्य लोकांचे फोन येतायत, त्यामुळे व्हिडिओ डिलीट केल्याचे सांगितले.  

अरबाज शेखने व्हिडीओत नेमकं काय म्हटलं?

‘माझ्या पप्पांना ब्रेन हॅमरेज झालाय म्हणून आम्ही त्यांना सोलापुरातील एका रुग्णालयात अॅडमिट केलं होतं. नंतर हृदयाचा प्रॉब्लेम झाला  म्हणून नोबल हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात आलं.  पण या हॉस्पिटलचा मला सर्वात घाण अनुभव आला होता. सर्वात आधी 10 हजार रुपये डिपॉझिट भरले. नंतर मला गोळ्यांची चिठ्ठी दिली.  त्यांनी मला, हॉस्पिटलच्या मेडीकलमधून गोळ्या आणि इंजेक्शन घ्यावे लागतील, असं सांगितलं. ते सर्व औषधांची किंमत 40 हजारांहून अधिक किंमतीची होती’, असे अरबाजने व्हिडिओत म्हटलं.

हॉस्पिटल प्रशासनाचे स्पष्टीकरण

सोलापुरातील नोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अमजद अली खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून आपली बाजू स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, ‘अरबाज शेख किंवा कोणत्याही रुग्णाला औषधं घेण्यासाठी कोणतेही बंधन घातलेले नव्हते.  अरबाज यांच्या वडिलांना  न्युरो संदर्भातील आजार होता, त्यामुळे त्यांना आधीच खर्चाची कल्पना दिलेली होती’, असं त्यांनी स्पष्ट केलं.  ‘मात्र त्यानंतर देखील त्याने हा व्हिडीओ का केला? याची कल्पना आम्हाला नाही, पण आम्ही कोणतीही चूक केलेली नाही’, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा

‘आमची कोणतीही चूक नाही’; अरबाज शेखच्या गंभीर आरोपांवर नोबल हॉस्पिटलची पहिली प्रतिक्रिया



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *