Pune Water Cut: वारीनंतर पुन्हा पाणीकपात; १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, भविष्यात पाण्याची टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय


पुणे: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची आणि काहीशी चिंताजनक बातमी आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पावसाने पुन्हा एकदा ओढ दिल्याने शहरात पाणीसंकट (Pune Water Cut) उभे ठाकले आहे. परिणामी, महापालिका प्रशासनाने येत्या १५ जुलैपासून पुणे शहरात पुन्हा एकदा एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान अंदाज आणि धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.(Pune Water Cut)

Pune Water Cut: वारीच्या पार्श्वभूमीवर नियमित केला होता पुरवठा

यंदा जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा झपाट्याने खाली गेला होता. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार जूनमध्येच महापालिकेने एक दिवसाआड पाणी देण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान, जुलैच्या सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली. ६ जुलै रोजी मुळशी आणि पिंपरी-चिंचवड भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे आळंदीतील इंद्रायणी नदीला पूर आला होता. याच काळात आषाढी वारीचे पुण्यात आगमन झाले. वारीसाठी आलेल्या लाखो वारकऱ्यांची आणि स्थानिक नागरिकांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये, म्हणून प्रशासनाने ७ जुलैपासून कपात मागे घेत पुण्यात नियमित पाणीपुरवठा सुरू केला होता. ही तात्पुरती व्यवस्था १२ जुलै रोजी पालखी सोहळा पुण्यातून मार्गस्थ होईपर्यंत कायम ठेवण्यात आली होती.

Pune Water Cut: पाऊस गायब झाल्याने चिंता वाढली

जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणसाखळीत १६ टीएमसीपेक्षा जास्त पाणी जमा झाले होते. खडकवासला धरण तब्बल ८५ टक्के भरल्यामुळे नदीपात्रात दीड टीएमसी पाणीही सोडण्यात आले होते. यामुळे पुण्यातील पाणीकपात कायमची रद्द होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. महापौरांनीही यावर पक्षनेत्यांच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारल्यामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरतील का, याबाबत पुन्हा चिंता निर्माण झाली आहे.

Pune Water Cut: खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय

हवामान खाते आणि जलसंपदा विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस पाऊस लांबण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून १५ जुलैपासून पुन्हा एक दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काळात जर पावसाचा जोर वाढला आणि धरणांमध्ये पाण्याची आवक सुधारली, तर परिस्थितीचा पुनर्आढावा घेऊन पाणीपुरवठा पूर्ववत करण्याबाबत विचार केला जाईल, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *