पवार परिवारात सध्या आनंदाचे वातावरण आहे. नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचा विवाह मुंबईत थाटामाटात पार पडला. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार पार्थ पवार यांचा साखरपुडा होणार आहे. ते अभिनेत्री कायनात धार यांच्याशी लग्न करणार आहेत. त्यांचा साखरपुडा लवकरच होणार असल्याचे म्हटले जात होते. आता सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याची पत्रिका समोर आली आहे.
कधी होणार पार्थ पवार यांचा साखरपुडा?
29 जुलैला पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पार्थ पवार यांच्या साखरपुड्याची पत्रिका शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी पोस्ट केलेली पत्रिका सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
रोहित पवारांनी शेअर केली पत्रिका
रोहित पवार यांनी शेअर केलेल्या पत्रिकेनुसार पार्थ पवार हे २९ जुलै रोजी साखरपुडा करणार आहेत. तसेच रोहित पवारांनी पत्रिका शेअर करत त्यांना सुखी संसारासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. “प्रेमाच्या रेशीमगाठीत अडकून नवी इनिंग सुरु करणारे माझे प्रिय बंधू खा. पार्थ आणि कायनात या दोघांनाही साखरपुड्याच्या मनापासून शुभेच्छा! तुमचा पुढील प्रवास आनंदाचा, सुखाचा आणि समृद्धीचा होवो आणि तुमच्या दोघांचं प्रेमाचं हे नातं उत्तरोत्तर बहरत जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!” असे त्यांनी म्हटले आहे.
प्रेमाच्या रेशीमगाठीत अडकून नवी इनिंग सुरु करणारे माझे प्रिय बंधू खा. पार्थ आणि कायनात या दोघांनाही साखरपुड्याच्या मनापासून शुभेच्छा! तुमचा पुढील प्रवास आनंदाचा, सुखाचा आणि समृद्धीचा होवो आणि तुमच्या दोघांचं प्रेमाचं हे नातं उत्तरोत्तर बहरत जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!… pic.twitter.com/bFK0XMJmb9
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 11, 2026
शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळेच्या लग्नात कायनात धार उपस्थित होती. त्या दोघांची जोडी पाहून सर्वांचे लक्ष वेधले गेले होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह ते दोघेही लग्नाला आले होते.
कायनात धार यांचे पवार कुटुंबाशी जवळचे संबंध आहेत. यापूर्वीही ती पार्थ पवार यांच्यासोबत विविध कार्यक्रमांमध्ये दिसली आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांनी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र दर्शन घेतले होते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पवार कुटुंबातील या नव्या आनंदाच्या घटनेने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या या नव्या सुरुवातीला सर्वांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.