Kolhapur Crime: कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश


Kolhapur Crime: कोल्हापूर-गारगोटी राज्य मार्गावर कळंबा साई मंदिर नजीक खड्ड्यांमुळे दुचाकीच्या धडकेत झालेल्या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान या व्यक्तीचा काल मृत्यू झाला. संतप्त झालेल्या नातेवाईक आणि नागरिकांनी काल (11 जुलै) सायंकाळी मृत राजेंद्र गायकवाड यांचा मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवून जोरदार निदर्शने केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला.

खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक 

कळंब्यात राहणाऱ्या राजेंद्र गायकवाड दोन दिवसांपूर्वी रस्त्यावरून जात असताना भरधाव येणाऱ्या दुचाकीस्वाराने खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक दिली होती. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचाराला राजेंद्र यांनी प्रतिसाद दिला नाही. काल शनिवारी  त्यांचा मृत्यू झाला. यावेळी स्थानिक नागरिकांनी नातेवाईकांनी राजेंद्र गायकवाड यांची काल अंत्ययात्रा काढली. यावेळी संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी अपघात झालेल्या राज्य मार्गावरील खड्ड्यात राजेंद्र यांचा मृतदेह ठेवून महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला. दरम्यान, या अंत्ययात्रेचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर महानगरपालिकेने खुलासा केला आहे. राजेंद्र गायकवाड यांचा अपघात होण्यास कारणीभूत असणाऱ्या तरुणांकडे स्पोर्ट्स बाईक होती.  भरधाव वेगाने येणाऱ्या या स्पोर्ट्स बाईकचा ताबा सुटून हा अपघात झाल्याचे स्पष्टीकरण महापालिकेनं दिलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर खड्डे

दुसरीकडे, गेले आठ दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. एका बाजूला राजेंद्र गायकवाड यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार खड्डे चुकवताना दुचाकी स्वाराने राजेंद्र गायकवाड यांना धडक दिल्याचे म्हणणं आहे. तर दुसऱ्या बाजूला महापालिकेने हा अपघात मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या वाहन चालकांनी केल्याचं म्हणणं आहे. या संदर्भात अधिक तपास करवीर पोलीस करत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *